राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक:
जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याने व्यक्त केले समाधान
ओरोस ता.०९-:
आमचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हा चौघांना जिल्हा नियोजन मंडळावर काम करण्याची संधी दिली आहे. विधानसभे प्रमाणे जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन मंडळ विकास कामांसाठी कार्यरत आहे. या मंडळाच्यावतीने जिल्ह्यातील गरज असलेला विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष हेमंत कुडाळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना नाईक यांनी, आमच्या दोघांसह प्रफुल्ल सूद्रिक, सावळाराम अणावकर अशा चौघांची जिल्हा नियोजन मंडळावर उपमुख्यमंत्री पवार यांनी विशेष निमंत्रित म्हणून निवड केली आहे. जनतेची कामे करण्यासाठी हे सभागृह आहे. त्यामुळे ही संधी लोकोपयोगी ठरावी, यासाठी जनतेच्या समस्या प्रत्येक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविणारा आहोत. पवार व सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कोणत्याही तालुक्यावर अन्याय न करता सर्वांचे समाधान होईल आणि गरजेची कामे केली जातील, याकडे आमचा लक्ष असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कुडाळकर यांनी, हे मिळालेले पद जबाबदारीचे आहे. मागील काही काळात सदस्य नसल्याने जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजात सुसूत्रता नव्हती. त्यामुळे आता पालकमंत्री यांना सहाय्य होईल, असे आम्ही काम करणार आहोत. जिल्हा नियोजन मंडळाचा २०२४-२५ चा आराखडा २०० कोटींच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सिंधुरत्न योजनेचा खर्च गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शासनाने सिंधुरत्न यासाठी निधी दिला तरी त्याचा विनियोग होताना दिसत नाही. त्यामुळे हा खर्च होण्यासाठी योजनेचे अध्यक्ष मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आम्ही केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता सुनीता रामानंद यांची बदली झाली आहे. त्यांच्या जाग्यावर नियमित अधिष्ठाता येत्या आठ दिवसांत हजर होणार आहेत. तसेच अधिष्ठाता रामानंद यांनी चुकीच्या पद्धतीने भरलेल्या सुरक्षा रक्षक कार्यवाहीची चौकशी सुरू झाली आहे, असे यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील वाळूचा प्रश्न सुद्धा निकाली काढला असल्याचे त्यांनी सांगितले.
