न्याय हक्कांसाठी पारंपारिक मच्छीमारांचे १६ नोव्हेंबरपासून उपोषण

⚡मालवण ता.०३-: सिंधुदुर्गच्या समुद्रात सुरु असलेल्या अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाई साठी पारंपारिक मच्छिमार गेली अनेक वर्षे मत्स्य व्यवसाय विभागाकडे मागणी करत असताना मत्स्य अधिकारी कारवाई करत नाहीत. पर्ससीन मासेमारीमुळे पारंपारिक मच्छिमारांना मासा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे पर्ससीनवर कारवाईसाठी आणि आमच्या न्याय हक्कासाठी दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०. ३० वाजल्यापासून मत्स्य कार्यालयासमोर उपोषणास बसणार, असा इशारा पारंपारिक मच्छिमारांच्या वतीने अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी निवेदनाद्वारे मत्स्य विभागाला दिला आहे.

जिल्ह्याच्या समुद्रात अनधिकृतपणे सुरु असलेल्या पर्ससीन मासेमारी विरोधात सध्या पारंपारिक मच्छिमार व पर्ससीन मच्छिमार यांच्यात संघर्षपूर्ण वातावरण असून पर्ससीन मासेमारी करणाऱ्या अनधिकृत नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई होत नसल्याने पारंपारिक मच्छिमारांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आज अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक मच्छिमारांनी मालवण येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयात मत्स्य अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी मिथुन मालंडकर यांच्यासह भाऊ मोर्जे, सन्मेष परब, रश्मीन रोगे आदी व इतर मच्छिमार उपस्थित होते.

सिंधुदुर्गातील पारंपारीक मच्छीमार गेली अनेक वर्षे आपल्या कडे अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या पर्ससीन बोटीवर कारवाई करण्याची वारंवार मागणी करत आहेत परंन्तु आपल्या अधिकाऱ्याकडून योग्य कारवाई होताना दिसत नाही. कारवाई करण्याचा दिखावा करून अनधिकृत पर्ससीन बोटींना मोकळीक दिली जाते. अधिकारी पारंपारिक मच्छीमारांना जुमानत नाहीत. पर्ससीन मासेमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई करत नाही. त्यामुळे पर्ससीन बोटी किनाऱ्यालगत येऊन मासेमारी करतात. आपल्या तोंडातील घास हिसकावून घेऊन जाताना बघुन आता पारंपारीक मच्छीमार आणि पर्ससीन धारक यांच्यामध्ये समुद्रामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. पारंपारीक मच्छीमारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार मत्स्य व्यवसाय खाते आहे. अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळेच हे प्रसंग उद्भवतात आहेत, असा आरोप मिथुन मालंडकर यांनी निवेदनात केला आहे.

सिंधुदुर्गातील अनधिकृत पर्ससीन मच्छीमारी बोटीवर आता मत्स्यआयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी स्वःतः येऊन कारवाई करावी, मालवणच्या अकार्यक्षम परवाना अधिकाऱ्यांना यांना निलंबित करण्यात यावे,
बंदरामध्ये ये जा करणाऱ्या बोटीची नोंदणी ठेवण्यासाठी सागरी सुरक्षा रक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. परंन्तु सुरक्षा रक्षकच अनधिकृत पर्ससीन मासेमारी करणाऱ्याशी सामिल असल्याने मालवण बंदर सर्जेकोट बंदर तसेच आचरा बंदरातील सागर सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्यात यावे, बंदरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, आचरेतील जप्तीची आदेश असलेली बोट तात्काळ ताब्यात घेण्यात यावी, तळाशील येथे झालेल्या पारंपारीक मच्छीमार आणि पर्ससीन मच्छीमार यांच्यात जो वाद झाला या वादात ज्या पर्ससीन बोटी सामील होत्या त्याच्या कागदपत्राची तपासणी करून कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्या मिथुन मलंडकर यांनी निवेदनातून करत पारंपारिक मच्छिमार आपल्या न्याय्य हक्कांसाठी दि. १६ नोव्हेंबर पासून मत्स्य कार्यालयासमोर उपोषणास बसतील, असे मिथुन मालंडकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page