राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी
सिंधुदुर्गनगरी ता ५
शिक्षकांना केवळ उद्याचा सक्षम नागरिक घडविण्याचे कार्य करू द्या ,त्यासाठी शिक्षकांना दिलेले साक्षरता सर्वेक्षणाचे काम तात्काळ थांबविण्यात यावे. स्वयंसेवी संस्थेकडून पूर्ण करून घेण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने शासनाकडे केली आहे याबाबतचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर केले
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये नव भारत साक्षरता सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देण्यात आले आहे. शिक्षकांचे मुख्य कार्य राज्यातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे असताना शिक्षकांना शैक्षणिक कार्य सोडून अशैक्षणिक कार्यात गुंतवून शिक्षणाचा खेळखंडोबा करण्याचा घाट घातला जात आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा कायदा मध्ये शिक्षकांच्या अशैक्षणिक कामास प्रतिबंध करण्यात आलेले असतांना शासन शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवून शिक्षण हक्क कायद्याचा भंग करत आहे.
तरी शिक्षकांना दिलेल्या सर्वेक्षणाच्या कामास संघटनेचा विरोध असून हे काम आपण राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थेकडून पूर्ण करून घ्यावे. कारण आजचा विद्यार्थी हा उद्याचे राष्ट्र घडविणारा नागरिक ठरणार आहे. विद्यार्थी जर कमकुवत असेल तर देशाचे भविष्य ही कमकुवत असणार आहे.भारतीय संविधानाच्या राज्यांना दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याचे आणि आपल्या नागरिकाचे हित पाहणे हे शासनाचे कर्तव्य ठरते म्हणून राज्यातील शिक्षकांना केवळ उद्याचा सक्षम नागरिक घडविण्याचे कार्य करू द्या, आणि आपण शिक्षकांना दिलेले साक्षरता सर्वेक्षणाचे काम हे तात्काळ थांबविण्यात यावे,
अन्यथा नाईलाजास्तव संघटनेला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे निवेदन आज राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक विलास जाधव यांनी निवासी उपजिल्हाधिकारी याना सादर केले.
