ऐन पावसाळ्यात आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणवाडीत पाणी टंचाई

नळ योजना झाली बंद:आंदोलनाचा इशारा

वैभववाडी संजय शेळके
    ऐन पावसाळ्यात आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणातील नळयोजना बंद असल्यामुळे धरणग्रस्तांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. पुनर्वसन गावठाणातील नळयोजना सुरु झाल्यापासून सलग आठ पंधरा दिवस पाणी मिळाले असे झाले नाही. त्यामुळे धरणग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी असून लवकरच पाणी प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांच्यावतीने अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समिती अध्यक्ष आकाराम नागप सचिव डाॕ.जगन्नाथ जामदार यांनी दिला आहे.
     अरुणा धरण प्रकल्पासाठी  आखवणे,नागपवाडी, भोम धरणग्रस्तांचे मांगवली, उंबर्डे , कुसूर हृद्दीत पुनर्वसन सन २०१९ साली करण्यात आले आहे. पुनर्वसन गावठाणासाठी सुमारे १० वर्षापूर्वी मांगवली येथे अरुणा नदीवर विहीर मारुन तिथून पुनर्वसन गावठाणात नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा योजना करण्यात आली. अरुणा धरणग्रस्तांचे जून २०१९ साली पुनर्वसन गावठाणात पुनर्वसन करण्यात आले.  त्यानंतर ही नळयोजना कार्यन्वीत करण्यात आली. माञ नळयोजना कार्यन्वीत झाल्यापासून सलग आठ पंधरा दिवसही सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. कधी पाईप फुटला म्हणून तर कधी मोटार जळाली तर अन्य तांञिक कारणांमुळे वारंवार पाणी पुरवठा खंडीत होत आहे. सुरुवातीला नवीन असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत असतील म्हणून नागरीकांनी समजून घेतले. माञ नळयोजनेचे हे दुखणे नेहमीचेच बनले आहे. त्यामुळे धरणग्रस्तांची डोकेदुखी वाढली आहे.
   भर पावसातही धरणग्रस्तांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. नळयोजनेचा नेमकी काय अडचण आहे. त्याचा अभ्यास करुन नळयोजना दुरूस्त करावी. नळयोजनेचा सर्व्हे करुन जुने व निकृष्ट दर्जाची असलेली पाईप लाईन बदलून नवीन पाईप लाईन करावी. अशी मागणी धरणग्रस्तांकडून वारंवार केली जात आहे. माञ पाटबंधारे विभाग तुटलेली पाईप जोडून चार आठ दिवसाने पाणी पुरवठा सुरु करण्यातच धन्यता मानत आहे.  त्यामुळे धरणग्रस्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
    पाणी पुरवठा बंद झाला की सर्वात मोठा फटका हा कुसूर पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्तांना बसत आहे. हे पुनर्वसन उंच डोंगरावर असल्यामुळे याठिकाणी खुली विहीर अथवा विंधन विहीरही नसल्यामुळे या गावठाणातील नागरीकांना सुमारे दिड दोन कि.मी.अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे.
   अरुणा धरणग्रस्तांच्या त्यागामुळे अर्ध्यापेक्षा जास्त तालुका ओलिताखाली येत आहे. माञ त्याच धरणग्रस्तांवर पाण्यासाठी वणवन करण्याची वेळ आली आहे. याबाबत धरणग्रस्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
   
चौकट-
काही दिवसापूर्वीच आमदार नितेश राणे यांनी पुनर्वसन गावठाणातील समस्या जाणून घेण्सासाठी पुनर्वसन गावठाणात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. यावेळी धरणग्रस्तांच्या पाणी प्रश्नांवर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले होते.पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढा अशा सक्त सुचना दिल्या होत्या. माञ तरीही अदयाप पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही.

कोट
    सन २०१९ साली पुनर्वसन गावठाणातील नळयोजना कार्यन्वित करण्यात आली. माञ सुरुवातीपासून नळयोजनेच्या तक्रारीमुळे धरणग्रस्त हैराण झाले आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नावर धरणग्रस्तांचे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा अरुणा प्रकल्प कृती समिती अध्यक्ष तथा उपसरपंच आकाराम नागप, सचिव डाॕ. जगन्नाथ जामदार सरपंच आर्या कांबळे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page