विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात सुनिल नांदोस्कर यांचे प्रतिपादन
⚡कणकवली ता.२६-: विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात प्राविण्य मिळवत असताना स्पर्धा परीक्षेत उतरून शासकीय अधिकारी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुनिल नांदोस्कर यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी श्री. नांदोस्कर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली, सचिव परशुराम झगडे, भाजपा प्रदेश कार्यालयीन मंत्री शरद चव्हाण, बाळ आजगांवकर, तुकाराम तेली, आबा तेली, चंद्रकांत तेली, दशरथ कवठकर, बापू तळवडेकर, निलेश कामतेकर, दया हिंदळेकर, शैलेंद्र डिचोलकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनिल नांदोस्कर पुढे म्हणाले,आपल्या जिल्ह्यात अनेक अधिकारी हे परजिल्ह्यातून स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय सेवेत दाखल होतात. परंतु, आपल्या समाजातील मुलेही कॉलेज करून मुंबई, गोवा याठिकाणी तुटपुंज्या पगारावर काम करतात. त्यामुळे मुलांनी चांगले शिक्षण घेऊन एमपीएससी, युपीएससी परीक्षा देऊन अधिकारी निर्माण व्हावेत, असेही श्री. नांदोस्कर म्हणाले.
यावेळी दहावी, बारावी परीक्षेत ८० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्कॉलरशिप, पदवीधर, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये प्राविण्य मिळविलेल्या मुलांचाही सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील सरपंच व ग्रा.पं. सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत लक्ष्मण तेली, परशुराम झगडे यांनी केले. तर आभार दया हिंदळेकर यांनी मानले. सदर सभेमध्ये तेली समाजाचा मेळावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
