सावंतवाडी नगर परिषदेचा शिल्लकी अर्थसंकल्प संजू परब यांनी केला सादर…

१२ विरुध्द ४ असा ठराव मंजूर;रस्ते व नळपाणी योजनेला प्राधान्य_

*💫सावंतवाडी दि.२६-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी आज सावंतवाडी नगर परिषदेचा ३० कोटी रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर केला. यात रस्ते व नळपाणी योजनेला प्राधान्य देण्यात आले आहे. तर १९ हजार लिटर पाण्यामागे फक्त दोन रुपये दर वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या वाढी विरोधात शिवसेनेच्या नगरसेविकांनी आक्षेप नोंदवत झालेली वाढ ही चुकीची असून कोरोना कालावधीत ही वाढ करू नये, अशी मागणी केली. या वाढीला आमचा विरोध असल्याचे सांगितले. मात्र त्यांचे म्हणणे खोडून काढत नगराध्यक्षांनी १२ विरुध्द ४ असा ठराव मंजूर केला. तसेच कोणताही अभ्यास न करता विरोधकांनी अर्थसंकल्पातील आकड्यावर बोलायचे सोडून विरोधी नगरसेवक भलत्याच विषयाकडे वळले त्यांचा अर्थसंकल्पावर अभ्यास नसल्याची टीकाही नगराध्यक्ष परब यांनी अर्थसंकल्पानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली. सावंतवाडी नगर परिषदेचा २० २१ २१ २२ चा अर्थसंकल्प आज लोकमान्य टिळक सभागृहात सादर करण्यात आला मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या अर्थसंकल्प सभेस उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, राजू बेग, मनोज नाईक, उदय नाईक, सुरेंद्र बांदेकर, नासिर शेख, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, दिपाली सावंत, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर आदी उपस्थित होते. या अर्थसंकल्पीय सभेस शिवसेना गटनेते अनारोजीन लोबो, भाजपा नगरसेवक ऍड परीमल नाईक, आणि शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक जयेंद्र परुळेकर हे अनुपस्थित होते. नगराध्यक्ष परब यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये प्रारंभी शिल्लक ३६ कोटी २७ लाख ८० हजार ५६२ रुपये तर एकूण जमा ३० कोटी ४७ लाख ५३ हजार १०० रुपये एकूण खर्च ३६ कोटी ६० लाख १० हजार रुपये अर्थसंकल्पात मांडण्यात आला. दरम्यान अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये ६४ कोटी तीस लाखाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. विकासाचे नियोजन करत असताना घनकचरा आणि पाणीपुरवठा साठी पन्नास टक्के खर्च प्रस्तावित करण्यात आला.

You cannot copy content of this page