डॉ शंकर मोडक प्रतिष्ठान बांदा यांचे आयोजन;अनेकांनी घेतला लाभ: ऍड नकुल पार्सेकर होते अध्यक्ष
बांदा/प्रतिनिधी
येथील आनंदी मंगल कार्यालयात डॉ. शंकर मोडक प्रतिष्ठान बांदा यांच्यातर्फे एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी अटल प्रतिष्ठान सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. नकुल पार्सेकर होते. शिबिराचा लाभ अनेकांनी घेतला.
तर प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्रा. राजाराम परब, गोव्याचे माजी शिक्षणाधिकारी माधव जोशी, शिवा तोरसकर, बांदेकर आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य धोपेश्वरकर, प्रा. तुकाराम मोरजकर, आरबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी नारायण मणेरीकर, लेखापरीक्षक चंद्रकांत सावंत, सुरेश गवस, एसबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश म्हाडगुत, मानसशास्त्रज्ञ डॉ. चिन्मयी नाईक, भोसला सैनिक स्कूल नाशिकचे सेवानिवृत्त अधीक्षक किशोर केसरकर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील, माजी प्राचार्य अन्वर खान, माजी पर्यवेक्षक अच्युत पिळणकर, अजित शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आले.
दिवसभरात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या एकदिवसीय व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन मोफत शिबिरात विविध मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी व पालक वर्गाला बँक क्षेत्रातील करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा व त्यांची तयारी, वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या संधी, कला क्षेत्रातील विविध संधी तसेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी या सोबतच मुलाखत तंत्र, देहबोली व व्यक्तिमत्व विकास अशा विविध क्षेत्रातील माहिती दिली. यावेळी बांदा केंद्रशाळा व डेगवे हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना पुस्तक पेटी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक अन्वर खान यांनी केले तर उपस्थितांचे आभार सेवानिवृत्त माजी पर्यवेक्षक अच्युत पिळणकर यांनी केले.
‘स्वर संध्या’ संगीत मैफिलीतून रंगत
दरम्यान सायंकाळच्या शेवटच्या सत्रात डॉ. शंकर मोडक प्रतिष्ठान आयोजित श्री सदगुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी, प्रस्तुत ‘स्वरसंध्या’ हा हिंदी, मराठी गीतांचा सदाबहार नजराणा सादर करण्यात आला. यात गायिका ऍड. सिद्धी परब, केतकी सावंत, नितीन धामापूरकर यांनी आपल्या बहारदार सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना संगीत साथ हार्मोनियमवर निलेश मेस्त्री, कीबोर्ड मंगेश मेस्त्री, तबला किशोर सावंत, ऑक्टोपॅड आश्विन जाधव यांनी दिली. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय कात्रे यांनी केले.
