⚡मालवण ता.२०-: अंतिम षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात उमेश इलेव्हन हुंबरठ संघावर ७ गड्यांनी विजय मिळविणाऱ्या दानिश इलेव्हन देवबाग संघाने फटाक्यांच्या आतषबाजीत आणि डीजे च्या तालावर हजारो क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषकावर आपले नाव कोरले विजेत्या दानिश इलेव्हन संघाला ३ लाख ४८ रुपये आणि चषक तर उपविजेत्या उमेश इलेव्हन हुंबरठ संघाला १ लाख ५० हजार ६९ रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक” या भव्य डे नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद देवबाग दानिश इलेव्हन संघाने पटकाविले. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक अंतिम सामन्यासाठी क्रिकेटप्रेमीनी तोबा गर्दी केली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुक्याच्या वतीने मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर १५ ते १९ मार्च या कालावधीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यासह देशातील विविध ठिकाणच्या नामांकित क्रिकेटपटूंचा सहभाग असलेले ३२ संघ सहभागी झाले होते. चार दिवस झालेल्या विविध सामन्यांमधून रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला, ओमसाई स्पोर्ट्स म्हापण, उमेश इलेव्हन हुंबरठ, दानिश इलेव्हन देवबाग या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली होती. काल रविवारी स्पर्धेच्या पाचव्या दिवशी रात्री उपांत्य व अंतिम सामना पार पडला.
यावेळी पहिल्या उपांत्य सामन्यात दानिश इलेव्हन देवबाग संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले संघाला मर्यादित ६ षटकात ७ बाद ३७ धावांवर रोखले. यात नरेश ठोमरे व शुभम जाधव यांनी प्रत्येकी दोन तर भूषण गोळे याने स्पर्धेतील पहिले निर्धाव षटक टाकत १ विकेट घेतली. ३८ धावांचे आव्हान देवबाग संघाने सचिन बर्गे याच्या नाबाद २४ धावांच्या जोरावर १ गडी गमावून पार करत एकतर्फी विजय मिळवीत अंतिम सामन्यात धडक मारली. भूषण गोळे सामनावीर ठरला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात उमेश इलेव्हन हुंबरठ संघाने ओम साई म्हापण संघाला ४ बाद ३६ धावांवर रोखत हे आव्हान गाठत एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यात हुंबरठ संघाचा गोलंदाज गौरव घूमरठ सामनावीर ठरला.
मशाली पेटवत अंतिम सामन्यास प्रारंभ
यावेळी अंतिम सामन्यापूर्वी मैदानावर आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, संदेश पारकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, खेळाडू यांच्या उपस्थितीत नाणेफेक करण्यात आली. यानंतर मशाली पेटवून राष्ट्रगीत व राज्यगीत म्हटल्यानंतर अंतिम सामन्यास सुरुवात करण्यात आली.
रोमहर्षक अंतिम सामन्यात देवाबगची बाजी
उपांत्य फेरीचे दोन्ही सामने एकतर्फी झाल्याने प्रेक्षकांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला. मात्र उमेश इलेव्हन हुंबरठ विरुद्ध दानिश इलेव्हन देवबाग या दोन तुल्यबळ संघामध्ये झालेली अंतिम लढत अटीतटीची व रंगतदार झाल्याने उपस्थित क्रीडा रसिकांच्या उत्साहाला जोर चढला. अंतिम सामन्यात उमेश इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ६ षटकात ४ बाद ६७ धावा जमवल्या. यामध्ये अनुराग मोहिते याने नाबाद २७ धावा तर अमित तांबे याने १२ धावा केल्या. प्रत्युत्तरा दाखल खेळणाऱ्या दानिश इलेव्हन संघाला सुरुवातीच्या षटकांमध्ये धक्के बसल्यानंतर मैदानात उतरलेल्या भूषण गोळे याने सूत्रे आपल्या हातात घेत संयमी आणि तेवढ्याच आक्रमक खेळीने संघाला विजयाच्या जवळ नेले. भूषण गोळे तडाखेबंद ३६ धावा करून बाद झाल्यानंतर हुंबरठ संघाला काही आशा निर्माण झाल्या. त्यांच्या संयमी गोलंदाजी मुळे हा सामना शेवटच्या षटकात पोहचला. मात्र अखेर दोन चेंडू बाकी ठेवून ५.४ षटकात देवबाग संघाने ३ बाद ६९ धावा जमवत स्पर्धेचे विजेतेपद पटकवले. देवबाग तर्फे शुभम जाधव यानेही १५ धावांची खेळी केली.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, नेते संदेश पारकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघाला पारितोषिक वितरण करण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- अमित तांबे (उमेश इलेव्हन), यष्टीरक्षक -सुनील पालयेकर – (ओम साई स्पोर्ट्स म्हापण), फलंदाज संदीप पाटील (दानिश इलेव्हन), उत्कृष्ट गोलंदाज- समीर वेंगुर्लेकर (दानिश इलेव्हन) मालिकावीर – सचिन बर्गे (दानिश इलेव्हन) या सर्वांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, यतीन खोत, भाई कासवकर, मंगेश टेमकर, बाबा सावंत, पंकज सादये, अवधूत मालंडकर, अमित भोगले, उमेश मांजरेकर, सेजल परब, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, सौ. शिल्पा खोत, तृप्ती मयेकर, सिया धुरी, विद्या फर्नांडिस, श्वेता सावंत, अंजना सामंत, निनाक्षी मेतर, आर्या गावकर, नंदू गवंडी, सन्मेश परब, भगवान लुडबे, मनोज मोंडकर, पंकज वर्दम, सिद्धार्थ जाधव, आशु मयेकर, रणजित परब, किरण वाळके, समीर लब्दे, तपस्वी मयेकर, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, अमेय देसाई, सचिन गिरकर, रश्मीन रोगे, अन्वय प्रभू, राहुल परब, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य शिवसैनिक आणि क्रिकेटप्रेमी नागरिक उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी सामनाधिकारी म्हणून बंटी केरकर, पंच म्हणून ऍम्बरोज आल्मेडा, उमेश मांजरेकर, दीपक धुरी, मंगेश धुरी, सुशील शेडगे, गुणलेखक गणेश कृष्णा राऊळ, पायस आल्मेडा, समालोचक म्हणून शाम वाक्कर, बादल चौधरी, प्रदीप देऊलकर, नाना नाईक, उत्तम मुणगेकर यांनी काम पहिले.
