पाडलोसमध्ये वनविभागाकडून बंदोबस्ताऐवजी केवळ पंचनामाच…!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी;पुन्हा केली हजारो रुपयांची चवळी फस्त

*💫बांदा दि.१६-:* वन्यप्राण्यांचा अधिवास अशी ओळख झालेल्या पाडलोस गावात दिवसेंदिवस गव्यांचा उच्छाद वाढतच चालला आहे. यावर कोणत्याही उपाययोजना किंवा गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग पंचनामा करण्यापलीकडे ठोस पावले उचलत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ पंचनामा करण्यावरच अधिकारी धन्यता मानत असल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाडलोस केणीवाडा येथे राजन नाईक यांनी जनावरांना खाण्यासाठी पेरलेला मका गव्यांनी सोमवारी फस्त केला. युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांनी पाहणी करून याची खबर वनविभागाला दिली. त्यानंतर पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मात्र शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांची झालेली नुकसानभरपाई आम्ही पूर्णपणे भरून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आजगाव वनपाल एस. धुरी यांनी सांगितले. यावेळी इन्सुली वनरक्षक श्री. पाटील, श्री. पडते, शेतकरी राजन नाईक, एकनाथ नाईक, अमोल कोरगावकर, सदानंद कोरगावकर, वामन केणी, बंटी नाईक, साईश नाईक, अमित नाईक, वैभव नाईक आदी उपस्थित होते. चवळी केली फस्त श्रीराम मंदिराजवळील सुमारे आठ गुंठ्यात पेरलेली चवळी काढणीयोग्य झाली होती. सर्व झाडांना शेंगा आल्या होत्या, परंतु सोमवारी रात्री गवारेड्यानी डाव साधत सर्व चवळी फस्त केली. बेरोजगारीमुळे शेतीकडे वळलेल्या युवा शेतकरी गणपत नाईक यांचे मात्र हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी श्री. नाईक यांनी केली आहे.

You cannot copy content of this page