कट्टा येथील आभाळमाया ग्रुपने आपलाच रेकॉर्ड मोडला
मालवण दि प्रतिनिधी
कट्टा येथील आभाळमाया ग्रुपच्या वतीने आणि गोवा, एसएसपीएम, ओरोस रक्तपेढी यांच्या सहकार्याने कट्टा येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये मागील वर्षीचा २२१ रक्तदात्यांचा विक्रम मोडीत काढीत आज तब्बल २५२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली .
प्रारंभी सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी या रक्तदान शिबिराचे दीपप्रज्वलन करून आणि स्वतः रक्तदान करून या शिबिराचा शुभारंभ केला. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक, वकील, पोलीस व सर्व क्षेत्रातील लोकांनी रक्तदान केले. सकाळी ९ वाजता सुरू झालेले रक्तदान शिबिर हे दुपारी दोन वाजेपर्यंत राबविण्यात आले. यावेळी आभाळमाया ग्रुपतर्फे रक्तदान करणाऱ्याला प्रमाणपत्र व एक झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी आभाळमाया ग्रुपचे सदस्य यांनी मोलाचे काम बजावले.
