सोनुर्ली देवी माऊलीचा ‘लोटांगण’ जत्रोत्सव

दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख : सिंधुदुर्गसह राज्यभरातून भाविक येणार

⚡सावंतवाडी ता.०९ -: दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज बुधवार ९ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या माध्यमातून घेण्यात आलेला धावता आढावा.


नवसाला पावणाऱ्या व दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव हा लोटांगणासाठी सिंधुदुर्गसह कोकणात प्रसिद्ध आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या देवीच्या चरणी जत्रोत्सवानिमित्त अनेक भक्त लीन होतात. त्यामुळे या देवी माऊलीची महती दिवसेंदिवस सर्वदूर पोहोचली आहे.
आई माऊलीच्या या जत्रोत्सवातील महत्त्वाचा क्षण म्हणजे रात्री लोटांगण. रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान सुमारे ९ ते १० हजार दरवर्षी लोटांगणे होतात. यावेळी प्रथम पुरुषांची झोपून लोटांगणे व त्या पाठोपाठ महिलांची उभ्याने लोटांगणे होतात. श्री देवी माऊलीची मूर्ती सुबक व आकर्षक आहे. जत्रोत्सवानिमित्त सोन्या चांदीच्या दागिन्यांनी तिला सजविले जाते. देवीचे हे सुवर्णालंकारांनी नटलेले मनोहारी रूप पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. मात्र अतिशय शांततामय वातावरणात हा सोहळा पार पडतो. ज्या भक्तगणांची मनोकामना पूर्ण होते, ते भक्तगण लोटांगण घालतात. जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तुळाभार कार्यक्रम पार पडतो.
तुळाभार म्हणजे ज्याने नवस केला त्याच्या वजनाची कुठलीही वस्तू देवीला अर्पण करणे. देवीच्या चरणांकडे बोललेले नवस अथवा मनोकामना पूर्ण झालेले भक्तगण तुळाभार करतात. अशा प्रकारे भक्तगणांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या माऊली देवीचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला आहे. जत्रोत्सावात मोठ्या स्वरूपात खरेदी-विक्री होते. एसटी महामंडळाच्या बसेस आणि खासगी वाहनांतून लाखो भाविक गर्दी करतात. जत्रोत्सवाचे विलक्षण दृष्य पाहणाऱ्या भक्तांचे मन तृप्त होते. रात्रीचा लोटांगण कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तगण एकच गर्दी करतात. देवीच्या मंदिराचा झगमगाट, लोटांगणाचा उत्सव आणि देवीचे सुखमय दर्शन डोळ्यात साठवून भाविक तृप्त होतात. सोनुर्ली जत्रोत्सवाची तयारी एक महिना अगोदरच सुरू होते. भक्तगणांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास होणार नाही, याची दखल देवस्थान कमिटी व गावकर मंडळी घेत असतात. लोटांगण घालणाऱ्या महिला, पुरुषांना चांगली सेवा देण्याची सुसज्ज तयारी देवस्थान कमिटीकडून करण्यात येत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा सर्वात मोठा लोटांगण जत्रोत्सव आहे. त्यामुळे सुसज्ज तयारी देवस्थान दरवर्षी कमिटी करत असते. पोलीस यंत्रणा, एसटी महामंडळ, विद्युत महामंडळ, बांधकाम विभाग, आरोग्य यंत्रणा या उत्सवासाठी कायम सज्ज असते.

You cannot copy content of this page