⚡कणकवली ता.२६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात व्यवस्था परिवर्तनाचे पर्व सुरू आहे.व्यवस्था परिवर्तन ही केवळ एका रात्रीत घडणारी गोष्ट नसून त्यासाठी मोठं नियोजन, मोठी तयारी आणि त्या परिवर्तनाच्या अंमलबजावणीसाठी मोठी हिम्मत लागते. सुदैवाने या सगळ्या बाबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वात आणि कर्तृत्वात आहेत.व्यवस्थेतील हे सकारात्मक बदल जाणीवपूर्वक जनतेपर्यंत जायला हवेत,त्याची चर्चा व्हायला हवी.अन्यथा त्याची किंमत रहात नाही असे प्रतिपादन ‘मोदी @ 20’ या पुस्तकाचे लेखक,प्रदेशाचे प्रवक्ते माधवराव भांडारी यांनी यावेळी बोलताना केले.
भारतीय जनता पार्टीच्या ‘ ‘सेवा पंधरवडा’ या अभियानांतर्गत बुद्धिजीवी संमेलनात ‘व्यवस्था परिवर्तनाची 20 वर्षे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून डॉक्टर्स, वकील,इंजिनिअर,सी ए, प्राध्यापक,शिक्षक असा प्रज्ञावंत परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या विषयाचे उदाहरण देताना ते म्हणाले की काही वर्षांपूर्वी कागदपत्र
‘ट्रू कॉपी’ म्हणजे अटेस्टेड करण्याची ‘व्यवस्था’ होती.काही ठिकाणी यासाठी किंमतही मोजावी लागत होती,त्याचा त्रास सहन केलेली आपली पिढी आहे.आता ही व्यवस्था बदलून ‘सेल्फ अटेस्टशन’ पद्धत आली. हा खूप मोठा दिलासादायक बदल आहे. पण याची कधी चर्चा झाली नाही त्यामुळे या नवीन व्यवस्थेचे महत्व लोकांच्या लक्षात आले नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व ही देशासाठी मोठी देणगी आहे.कोणतीही छोटी मोठी निवडणूक न लढवता पक्ष आदेशाने मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहीतच आहे.
मुख्यमंत्री पदाची 12 वर्षे आणि पंतप्रधान पदाची 8 वर्षे अश्या एकूण 20 वर्षाच्या वाटचालीचा आढावा ‘मोदी@20’ या पुस्तकात आहे.
विकासाच्या,देशहिताच्या,संस्कृती रक्षणाच्या आणि राष्ट्राभिमान जागविणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं इतकं तपशीलवार नियोजन असल्याने आज देशात कालबाह्य व्यवस्थेत अनोखे परिवर्तन घडून आलेले आहे.
काही वर्षांपूर्वी इतर विकसित देशांकडून अवहेलना सहन करणारा आपला भारत देश आज जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे.विकासाच्या अनेक मापदंडात जगाच्या क्रमवारीत अव्वल ठरत आहे.हे सगळे बदल व्यवस्था परिवर्तनामुळे आलेले आहेत.
आधार लिंकिंग, उज्वला सारख्या अनेक योजनांचा उल्लेख त्यांनी केला.पुढे बोलताना ते म्हणाले की देशातल्या डिजिटल क्रांतीने तर अनेक देशांना मागे टाकलेलं आहे.
आपल्या देशवासियांना मातृभूमीत सुखरूप आणि सन्मानाने आणण्यासाठी दोन देशाच्या युद्धात ‘विराम’ घेतला जातो.हा परिणाम आहे गेल्या काही वर्षातल्या देशातील व्यवस्था परिवर्तनाचा आणि जगाने त्याची नोंद तसेच दखल घेतल्याचा. आपल्या बोलण्यात त्यांनी अश्या अनेक विषयांना स्पर्श केला.शेवटी बोलताना ते म्हणाले की कोरोना काळात या व्यवस्था परिवर्तनाचा अनुभव देशवासीयांनी घेतलेला आहे.लसनिर्मिती साठी देशात स्वतःच्या चार कंपन्या,विक्रमी वेळात देशवासीयांसाठी मोफत 200 कोटी डोस आणि जगातल्या 101 देशांना माफक दरात लस वितरित करणे ही मोठी कामगिरी आहे.प्रत्येक भारतीयाचा देशाभिमान वाढविणारी आहे.
समारोप करताना ते म्हणाले की आपण सर्व बुद्धिजीवी मंडळी आहात, ओपिनियन मेकर आहात. त्यामुळे हे बदल तुमच्यापर्यंत पोचविण्याचा हा प्रयास आहे.तुमच्या अभ्यासू वृत्तीने तुम्ही ते ताडून पाहावेत आणि तुमचा प्रभाव असलेल्या सामान्य जनतेपर्यंत न्यावेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीही सेवा पंधरवडा या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केलं,कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी तर सूत्र संचालन डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी केलं,आभार प्रसन्ना देसाई यांनी मानले.यावेळी व्यासपीठवर महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे,शरद चव्हाण, उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनीही यावेळी आपली मते मांडली.
