अन्यथा उपोषणास बसू;ग्रामस्थांतर्फे विनोद भोगावकर यांचा इशारा
⚡मालवण ता.३१-: कुंभारमाठ येथील मालवण- कसाल रस्ता ते सर्वोदय कॉलनी कंपाउंड पर्यंत जाणारा रस्ता नोंद असून याठिकाणी घरांचे बांधकाम होत असल्याने अनेकांनी चिऱ्याचे व दगडी कंपाऊंड घातले आहेत, यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा त्यांच्या शेतीकडे जाणारा हा रस्ता अडला गेला असून यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांची वाट बंद करण्यासारखा हा प्रकार असून रस्ता ग्रामस्थांसाठी खुला करून द्यावा अन्यथा कुंभारवाडीतील ग्रामस्थ पंधरा दिवसानंतर मालवण तहसील कार्यालय समोर उपोषणास बसतील, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने विनोद भोगावकर यांनी मालवणचे तहसीलदार अजय पाटणे याना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
कुंभारमाठ येथील मालवण कसाल रस्ता ते सर्वोदय कॉलनी कंपाउंड पर्यंत जाणारा रस्ता हा २६ नंबरला नोंद असून या रस्त्यासाठी शासनस्तरावर दोन वेळा खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी खर्च झालेला आहे. तेथील कुंभार समाजातील ग्रामस्थांची शेतजमीन सर्वोदय कॉलनीच्या पुढील कंपाउंडच्या बाहेर आहे. या ठिकाणी घरांचे बांधकाम होत असल्याने अनेकांनी आपआपल्या जागेमध्ये चिऱ्यांचे दगडी कंपाउंड घातले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांना शेतीकडे जाताना तसेच नांगर, बैल जोडी नेताना हाल होत आहेत. त्या जागेत मध्येच पाणी असल्याने पूर्णपणे वळसा मारून ग्रामस्थांना भाताची ओझी डोक्यावरून वाहून न्यावी लागत आहेत. तसेच त्या भागात कुंभार काम करण्यासाठी लागणारी माती असल्याने ग्रामस्थांना माती टोपलीतून डोक्यावरून न्यावी लागते. सर्वोदय कॉलनीचा हा रस्ता पुढे कंपाउंड बाहेर नेल्यास त्या जागेतील ग्रामस्थ बॉण्ड पेपरवर संमतीपत्राने रस्ता पुढे नेण्यास तयार आहे. या ग्रामस्थांनी विविध विकास कामांसाठी ग्रामपंचायतीला जागा हस्तांतरीत केल्या त्याच ग्रामस्थांना वाट बंद करण्यासारखा प्रकार घडत आहे. सर्वोदय कॉलनीतील ग्रामस्थही सदर कंपाउंड पाडण्यास व वाट देण्यास तयार आहेत त्यामुळे तहसीलदारांनी हा रस्ता स्थानिक ग्रामस्थांसाठी खुला करून द्यावा अन्यथा तहसिलदार कार्यालयासमोर उपोषणास बसू, असे विनोद भोगावकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी ८० ग्रामस्थांनी केलेल्या सह्यांचे निवेदन तहसीलदार श्री . अजय पाटणे यांना देण्यात आले . यावेळी श्री . विष्णू ( बाबा ) मोंडकर , श्री . अविनाश सामंत , कुंभारमाठ सरपंच श्री . प्रमोद भोगांवकर , ग्रामपंचायत सदस्य श्री . विनोद भोगांवकर , विनय लंगोटे , काका लंगोटे , श्री . निगवेकर , उदय मिसाळ , युवराज मिसाळ , बाबू मिसाळ , रजत साठे , प्रथमेश साठे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .
