अँड.परिमल नाईक यांचा जीवप्रवास प्रेरणा देणारा;वाढदिनी ग्लोबल महाराष्ट्रने घेतलेला आढावा
सावंतवाडी ता. ०९ – विनय वाडकर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित प्रतिष्ठित वकील म्हणून सावंतवाडी शहरातील अँड. परिमल गजानन नाईक यांच्याकडे नेहमीच पाहिले जाते. एक वकील ते एक आदर्श समाजसेवक म्हणून अँड परिमल नाईक यांचे असलेले कार्य अतुलनीय आहे. आज होणाऱ्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र ने घेतलेला हा धावता आढावा….
१२ वी पर्यंतचे शिक्षण सावंतवाडी शहरात पूर्ण केल्या नंतर त्यांनी आपल्या पुढील शिक्षणासाठी पुणे येथे जाण्याचे ठरवले. पुण्यामध्ये त्यानी I.L.S. कॉलेज मध्ये LL.B चे ५ वर्षाचे शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत पूर्ण केले. तसेच त्यांनी D.T.L. आणि D.L.L. मध्ये स्पेशल डिप्लोमा देखील पूर्ण केला. त्यानंतर सन १९९२ सालापासून मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी आपला वकिली व्यवसाय सुरु केला. परंतु आपल्या मातृभूमीची कोकणची ओढ असल्याने अवघ्या एका वर्षाच्या आतच ते पुन्हा सिंधुदुर्गात आले आणि त्यांनी इथेच आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात करत, सिंधुदुर्गातील विविध न्यायालयात वकील म्हणून उत्तमरीत्या काम केले. या सगळ्या कालखंडात 2000 साल हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. त्यांच्या वकिली व्यवसायातील केलेल्या उत्कृष्ठ कामाची पोच म्हणून त्यांची नियुक्ती दिवाणी न्यायाधीश म्हणून करण्यात आली. परंतु, काही कौटुंबिक कारणांमुळे ते त्या पदावर रुजू झाले नाहीत. त्याच सालात महाराष्ट्र राज्य न्याय आणि विधी शाखा मंत्रालयामार्फत त्यांची निवड जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता म्हणून करण्यात आली. केंद्र सरकारच्या विधी व न्याय शाखेने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नोटरी पब्लिक पदी अँड परिमल नाईक यांची नियुक्ती केली. वकील संघटनेचे अध्यक्षपद देखील त्यानी लिल्या सांभाळले आहे. आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. जिल्ह्यातील एक यशस्वी वकील म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
सामाजिक कार्याची आवड असल्याने समाजाची सेवा करता यावी यासाठी ते २०१७ सालच्या सावंतवाडी नगरपालिका म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरले आणि मोठ्या मताधिक्यानी निवडून देखील आले. त्यानंतर त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा वापर करून शहरातील अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. २०२० साली सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य सभापती हे पद सांभाळताना कोरोना सारख्या आजाराच्यावेळी त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून एक योद्धा म्हणून काम केले आहे. त्यांच्या आरोग्य सभापती पदाचा कालखंडात घेण्यात आलेल्या स्वछता सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानात सावंतवाडी शहर स्वच्छ करण्यासाठी खूप प्रयत्न केले, आपल्या सहकारी नगरसेवक, पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबत नागरिकांमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती केली. त्यानी केलेले प्रयत्न आणि त्यांना जनतेच्या मिळालेली साथीमुळे संपूर्ण जिल्ह्यात सावंतवाडी नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला होता.
लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून ते अविरतपणे समाजसेवेत मग्न असून, अनेक समाजाभिमुख कामे त्यांनी केली आहेत. अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लायन्स क्लब द्वारे विविध उपक्रम राबवून समाजाची सेवा करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. पर्यावरणावर असलेल्या प्रेमामुळे ते दरवेळी विविध उपक्रम राबवत असतात.
एक आदर्श नमाकिंत वकील ते एक पर्यावरणप्रेमी, एक आदर्श समाजसेवक म्हणून त्यांनी आज आपली ओळख सावंतवाडीतच नव्हे तर सावंतवाडीच्या बाहेर देखील निर्माण केली आहे. त्यांचे सुरू असलेले सामाजिक कार्य हे अतुलनीय आहे. आज साजऱ्या होणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र कडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा…