शिक्षक विवेकानंद सावंत यांनी रेखाटले पर्यावरणाचे महत्त्व
⚡बांदा ता.०८-: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक प्रकारे जनजागृती करण्यासाठी विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस मधील शिक्षक विवेकानंद सावंत यांनी “पर्यावरण” या शब्दातूनच निसर्गाचे शब्दरूपी चित्रातून वर्णन केले आहे. या चित्राला पाहण्यासाठी पर्यावरण व पर्यटन क्षेत्रातील अनेक मोठमोठ्या मान्यवरांनी भेट दिली व शिक्षक श्री सावंत यांचे कौतुक केले.
विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस मध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. संपूर्ण पृथ्वी पर्यावरणावर कशाप्रकारे अवलंबून आहे याचे वर्णन श्री. सावंत यांनी काढलेल्या शब्दरूपी चित्रात दिसून येते. या चित्रात गवत, पाणी, माती, झाडांची मुळे तसेच सजीव प्राण्यास कशाप्रकारे ऑक्सिजन मिळेल याचे खरेखुरे चित्र विवेकानंद सावंत यांनी रेखाटले आहे. अशा प्रकारच्या चित्रातूनच विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयी जिव्हाळा निर्माण होणार असल्याचे सांगत आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश ऊर्फ बाळा परब यांनी सांगितले. तसेच युट्यूब फेम मयेकारीन म्हणजेच अर्चना परब, प्रभारी मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, श्रीरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित पाटील, वनश्री फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, वटवाघुळ संशोधनकर्ते राहुल खानोलकर आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री.सावंत यांच्या कलेचे कौतुक केले.