सावंतवाडी : सावंतवाडी-रेडी मार्गावर निरवडे-न्हावेली दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र, ही मलमपट्टी निरर्थक असून या रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या रस्त्याची खड्डयांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. वाहने हाकताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. यावर पर्याय म्हणून चालकांनी गटारीतूनच नवीन रस्ता तयार केला आहे
. मात्र, त्यामुळे अपघाताचीही भीती निर्माण झाली आहे. चार दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम संबंधित विभागाकडून सुरु करण्यात आले असून त्यामुळे चालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या रस्त्यावरील खड्डे दरवर्षी बुजविण्यात येतात आणि पावसाळ्यानंतर स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते. शासनाचा निधी वाया जातो. त्यामुळे या रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
