दांडेली-घोणसेवाडीत गव्यांनी अडविली वाहनचालकाची वाट
*💫बांदा दि.२६-:* अंधारमय रस्ता, चोहीबाजूने घनदाट झुडपे अशा दांडेली-घोणसेवाडी येथून मळेवाड रुग्णालयात जात असताना दीड ते दोन फुटाच्या अंतरावर अचानक चार ते पाच गवे रेडे आले. खड्डेमय रस्त्यावर गाडीही त्याचवेळी बंद झाल्याने वाहनचालकांसह ग्रामस्थांची भीतीने चाळणच उडाली. परंतु प्रसंगवधान राखत गाडी सुरू करून चालकाने त्या गव्यांच्या कळपातून आपल्यासह शालेय मुलीची सुटका केल्यामुळे थोडक्यात अनर्थ टळला. दांडेली घोणसेवाडी येथून तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष देवेंद्र माणगावकर हे आपल्या मुलीसह मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात जात असताना घोणसेवाडी पुलाजवळ शुक्रवारी रात्रो 8 वाजताच्या सुमारास अचानक चार ते पाच महाकाय गव्या रेड्यांनी त्यांचा रस्ता अडविला. त्याचक्षणी चारचाकी कार अचानक बंद पडल्याने गाडीपासून केवळ दीड ते दोन मिटराच्या अंतरावर गवे असल्याने मुलीने घाबरून आरडाओरड केली. परंतु पाच मिनिटे तरी गवे रस्त्यावर ठाण मांडून राहिले. देवेंद्र माणगावकर यांनी प्रसंगावधन राखून गाडी सुरू केली व आपल्यासह मुलगी दीपीक्षा माणगावकरचे प्राण वाचविल्याचे त्यांनी सांगितले. बांदा-शिरोडा मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांची गव्यांनी अनेक वेळा वाट अडविल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा धोकादायक प्राण्यांपासून ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष केली आहे. तसेच अशा परिस्थितीत आमच्या जिवास धोका उद्भवला तर त्याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी वनविभागाला केला आहे.
