डिझेल दरवाढीमुळे त्रस्त मच्छीमारांना शासनाने न्याय द्यावा- मेघनाद धुरी

*⚡मालवण ता.२५-:* डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे मच्छीमारांना व्यवसाय करणे मुश्किल बनले असून मासेमारी व्यवसाय कोलमडला आहे. डिझेल दरवाढीचा मच्छीमारांच्या दृष्टीने कोणताही विचार झालेला असून राज्य व केंद्रसरकरचा मासेमारी व्यवसायावर दुर्लक्ष झालेला आहे. मासेमारी व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे शासनाने मच्छीमारांना न्याय द्यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. मालवण धुरीवाडा येथील हॉटेल सायबा येथे मच्छीमार सोसायटी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी देवदुर्ग मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाळेकर, संचालक गुरुनाथ वाडेकर, तारामुंबरी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष विनायक प्रभू, संचालक राजाराम आडकर, देवगड मच्छीमार सोसायटी उपाध्यक्ष सचिन कदम, मिठबाव मच्छीमार सोसायटी अध्यक्ष धर्माजी आडकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी मेघनाद धुरी म्हणाले, जिल्ह्यात सध्या डिझेलचा दर १०४ रुपये १० पैसे एवढा झाला आहे. यामुळे मच्छीमार, बोट मालक, गिलनेटधारक यांना व्यवसाय करणे जिकिरीचे बनले आहे. मच्छीमारांना मिळणारा डिझेल परतावा देखील दोन वर्षांनी मिळतो. डिझेल दरवाढीमुळे माशांची वाहतूक करणारे टेम्पो, ट्रक चालक भाडे वाढवून पैसे वसूल करतात. मात्र मच्छीमारांचा व्यवसाय आहे त्याच प्रमाणात चालू आहे. माशांचे दरही कोणी वाढवून देत नाही. समुद्रातील बदलत्या हवामानाचाही फटका मच्छीमारी व्यवसायास बसत आहे. दुसरीकडे डिझेल दर वाढीमुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारली नाही तर मच्छीमारांना व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन मच्छीमाराना न्याय मिळवून द्यावा, असेही यावेळी मेघनाद धुरी म्हणाले.

You cannot copy content of this page