नूतनीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी
*⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी – रेडी मार्गावरील मळगाव घाटीतील रस्ता दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. ठिकठिकाणी पडलेले लहान – मोठे खड्डे, दरीच्या बाजूने खचत चाललेला भूभाग, केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असलेले जुनाट वृक्ष या आणि अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या या रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता पूर्णतः नूतनीकरण करावे, अशी मागणी होत आहे. मळगाव घाटीतील रस्त्याची लांबी केवळ दीड ते दोन किलोमीटर आहे. मात्र, हा रस्ता तीव्र उताराचा आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर रस्त्याच्या मधोमध आहेत. त्यामुळे वाहचालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. रात्रीच्या वेळी तर जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागतात. काही दिवसांपूर्वी येथील अलकनंदा सभागृहाच्या समोरील काही मीटर रस्त्याची संबंधित विभागाने डागडुजी केली होती. मात्र, खड्ड्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि चालकांच्या सुरक्षिततेकडेही! हा रस्ता खोल दरीच्या बाजूने खचत चालला असून दरडीच्या बाजूने ढासळत चालला आहे. दरीच्या बाजूने मजबूत रेलिंग बसविणे गरजेचे आहे. पण असे न करता तकलादू उपाययोजना केल्या जातात. गेल्या जून महिन्यात या रस्त्यावरील पूल खचला होता. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. लागलीच रस्ता बंद करून डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रस्त्यानजीकचे काही जुनाट वृक्ष कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. असे धोकादायक वृक्ष तोडणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने चालकांच्या जीवाशी न खेळता या रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थ तसेच चालकांतून केली जात आहे. आमदार केसरकर यांनी लक्ष द्यावे…. आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या सावंतवाडी मतदार संघात अनेक विकासकामे मंजूर करून ती पूर्णत्वासही नेली आहेत. सावंतवाडीत मल्टिस्पेशालिटी रुग्णालयही मंजूर करून घेतले आहे. कोणतेही मोठ्यातमोठे विकासकाम मंजूर करून घेण्याची क्षमता असलेले केसरकर यांनी या रस्त्याकडेही गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे.
