वाचन संस्कृती लेखन संस्कृती ग्रंथात ऊब’ या काव्यसंग्रहाची विशेष नोंद
*⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-:* मराठी साहित्य इतिहासातील वाचन संस्कृती लेखन संस्कृती या ग्रंथात महाराष्ट्रातील काही निवडक विद्यार्थ्यांच्या काव्यसंग्रहापैकी जिल्हा परिषद पूर्णं प्राथमिक शाळा देवसु या प्रशालेच्या विद्यार्थी प्रातिनिधिक ‘ऊब’ या काव्यसंग्रहाची विशेष नोंद करण्यात आली. महाराष्ट्रातील शिक्षण सचिव, संचालक यांनी वाचन संस्कृती लेखन संस्कृती या संदर्भ ग्रंथाची नोंद घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना लिहिते करणारे शिक्षकही सुखावले आहे. बालकुमारीमधील वाचन संस्कृतीचा विचार केल्याशिवाय त्यांच्यातील लेखन संस्कृतीचा विचार होऊच शकत नाही. कारण वाचन संस्कृती हा लेखन संस्कृतीचा पाया आहे. या अनुषंगाने देवसु शाळेतील तत्कालीन प्रयोगशील शिक्षक कवी मनोहर परब यांनी वाचन संस्कृतीचा विकास होण्याच्या दृष्टीने विद्यार्थी पुस्तकभिशी हा उपक्रम राबविला. जाणीवपूर्वक केलेल्या वाचन संस्कारामुळे आणि लेखन संस्कारामुळे बालकुमारांचा जीवनविषयक दृष्टिकोन तयार व्हायलाही मदत झाली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे तत्कालीन संचालिका शकुंतलाबाई काळे यांनी देवसु शाळेचे अभिनंदन केले तर माजी संचालक तथा बालसाहीत्यिक न. म. जोशी व जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या तत्कालीन अध्यक्षा संजना सावंत यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले. तसेच गीतकार प्रवीण दवणे, जेष्ठ लेखिका डाॅ. विजया वाड यांनीही कौतुक केले. कवी मनोहर परब या उपक्रमशील शिक्षकांनी राबविलेला उपक्रम वाचनातून आणि लेखनातून बाळगोपाळांमध्ये ‘स्व’ ची जाणीव विकसित होण्यास मदत झाली. वाचन संस्कृती लेखन संस्कृती ह्या ग्रंथात महाराष्ट्रातील अशा उपक्रमांचा संशोधनपूर्वक आढावा घेतला आहे. देवसु शाळेतील विद्यार्थ्यांच्या या काव्यसंग्रह निर्मितीसाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्जनशील विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.
