कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना आता“मोदी एक्सप्रेस”

आम.नितेश राणे यांची घोषणा; पूर्ण प्रवास विनामूल्य असणार

*⚡कणकवली दि.२२-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणचे भूमिपुत्र नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी देत कोकणी जनतेला एक प्रकारे हा आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे यावर्षी कोकणातील चाकरमान्यांसाठी एसटी बसेस नाही तर थेट “मोदी एक्सप्रेस” “गणपती स्पेशल” रेल्वे सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली. कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव हा फार मोठा सण आहे. दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाण्याकरिता एसटी बसेसची सोय उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, यावर्षी १८ बोगीची असलेली या गणपती स्पेशल रेल्वेमधून मुंबई ते कोकण असा प्रवास करता येणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ही रेल्वे दादर स्टेशन वरून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून सुटणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. हा पूर्ण प्रवास विनामूल्य असणार आहे. तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक वेळचं जेवण देखील मोफत देण्यात येणार आहे. या रेल्वेने मुंबईतून कोकणात येण्यासाठी बुकिंगकरिता कणकवली मतदारसंघातील जे भाजपाचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांच्याजवळ २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत चाकरमान्यांनी संपर्क साधायचा आहे. देवगड मंडळाचे अध्यक्ष संतोष किंजवडेकर आणि डॉ. अमोल तेली, वैभववाडी तालुकाध्यक्ष नासीर काझी व कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि संतोष कानडे यांच्याशी संपर्क साधून बुकिंगसाठी जागा निश्चित करून घ्यायची आहे, अशी माहिती राणे यांनी दिली. दादर ते सावंतवाडी अशी ही रेल्वे मार्गक्रमण करणार आहे. यात वैभववाडी व कणकवली या रेल्वे स्टेशनवर मोदी एक्सप्रेस थांबणार आहे. १८ डब्यांच्या या विशेष रेल्वे मध्ये आपली जागा निश्चित करा असे आवाहन देखील राणे यांनी केले आहे. कोकणातील जनतेमुळे आम्हाला मोठा आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे “मोदी एक्सप्रेस गणपती स्पेशल’ ही विशेष रेल्वे कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर सोडण्यात येणार आहे. या विशेष मोदी एक्सप्रेस गणपती स्पेशल रेल्वेचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page