दांडेली पूल पाण्याखाली

नदीचे पाणी बागायतीत शिरले : वाडीचा गावाशी संपर्क तुटला

*💫बांदा दि.१४-:* सावंतवाडी-न्हावेली-दांडेली-आरोंदा मार्गावरील दांडेली येथील पूल आज सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. पुलावर चार ते पाच फूट पाणी आल्याने चार तास वाहतूक खोळंबली होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस जोरदार सुरू असल्याने दांडेलीवाडीचा गावाशी संपर्क तुटला होता. वारंवार पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात मागणी करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप माणगावकर यांनी केला. आरोस पंचक्रोशीत गेले चार दिवस मुसळधार पावसाने थैमान घातले. न्हावेली-दांडेली मार्गे मळेवाड, तळवणे गावातून जाणारी नदीचे पाणी पात्राबाहेर येत नदीलगत असलेल्या बागायती शिरले. सावंतवाडी-न्हावेली-दांडेली मार्गे आरोंदा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. दांडेली पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. ग्रामस्थांनी वाहने वेळीच रोखून वाहनचालकांना सावध केले. दांडेलीतील पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जाते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याने अशा नैसर्गिक आपत्तीला दांडेली गावातील ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीप माणगावकर यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत पुलावर पाणी होते.

You cannot copy content of this page