कृषी खात्याने नुकसानीची दखल घेण्याची सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाची मागणी
बांदा/सकाळ वृत्तसेवा
बिपरजॉय, निसर्ग, तौक्ते यांसारख्या प्रचंड वादळांचा सामना करत संघर्षातून सिंधुदुर्गातील शेतकरी पुन्हा उभा राहिला आहे. काजूला अपेक्षित बाजारभाव मिळत नसतानाही शेतकऱ्यांनी बागांची पुन्हा उभारणी केली. मात्र, निसर्गाचे संकट अद्यापही शेतकऱ्यांची पाठ सोडत नसून, यंदा कमी पाऊस आणि त्यानंतर निर्माण झालेल्या लहरी वातावरणाचा मोठा फटका सुपारी बागायतदारांना बसला आहे. सुपारीची मोठ्या प्रमाणात गळ होत असून, कृषी खात्याने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी केली आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तसेच क्षणात पाऊस आणि क्षणात ऊन, अशा बदलत्या वातावरणामुळे सुपारी बागांवर विपरीत परिणाम झाला आहे. ऑक्टोबर हिटसदृश उष्ण वातावरणामुळे सुपारीची मोठ्या प्रमाणात गळ होत असल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दापोली कृषी विद्यापीठाकडे सुपारी गळतीवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी करूनही अद्याप प्रभावी उपाय उपलब्ध झालेला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नुकसानीचे पंचनामे करण्याची विनंती करूनही अद्याप पंचनामे झालेले नाहीत. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या हीदेखील मोठी अडचण आहे. एका कृषी कर्मचाऱ्यावर आठ-दहा गावांची जबाबदारी असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.
पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील कृषी यंत्रणाही प्रभावीपणे कार्यरत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे. लोकप्रतिनिधींनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कारण जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा स्थिरस्थावर होत असतानाच वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे त्यांची आर्थिक घडी विस्कटत आहे.
सुपारी बागायतदारांसमोर सध्या ‘टू बी ऑर नॉट टू बी’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, त्यांच्या नुकसानीची शासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. कृषी विभागाने विलंब न करता गावागावांत प्रत्यक्ष पाहणी करून सुपारी गळतीचे पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही श्री सावंत यांनी केली आहे.
फोटो:-
विलास सावंत.
