तडजोडीतून तब्बल ५१.१५ लाख रुपयांचा समझोता..
⚡ओरोस ता १८-: धनादेश अनादर (एनआय ॲक्ट, १८८१ कलम १३८) अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून जलदगतीने निकाली काढण्यासाठी आयोजित विशेष लोकअदालतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४६ प्रकरणांचा एकाच दिवशी निकाल लागला. या प्रकरणांमध्ये ५१ लाख १५ हजार ८७० रुपयांच्या तडजोडी करण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा न्यायालयात एक आणि तालुका न्यायालयांमध्ये सात अशा एकूण आठ पॅनेलद्वारे प्रकरणांची सुनावणी करण्यात आली. जिल्हा न्यायालयातील पॅनेलमध्ये द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. पाटील आणि विधीज्ञ प्रसाद सावंत यांनी कामकाज पाहिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देशिंगकर हेही उपस्थित होते.
विशेष लोकअदालतीत पक्षकार आणि विधीज्ञांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जिल्हा व तालुका न्यायालयांतील न्यायिक अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनीही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
तडजोडीने प्रकरणे निकाली निघाल्यामुळे संबंधित पक्षांतील सामंजस्य कायम राहण्यास मदत झाली. तसेच या निकालांविरुद्ध अपीलची गरज नसल्याने पक्षकारांचा वेळ, खर्च आणि न्यायालयीन प्रक्रिया यांचीही मोठी बचत झाल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नमूद केले.
फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी:
