Headlines

महिलांच्या उच्च शिक्षणासाठी ऐतिहासिक पाऊल ; जामसंडेत बी.एस्सी. होम सायन्स महाविद्यालयाचा शुभारंभ

बी.एस्सी. होम सायन्ससह पोषणशास्त्र व आहारशास्त्र, संसाधन व्यवस्थापन व अंतर्गत सजावट, वस्त्रशास्त्र व फॅशन डिझाईन अभ्यासक्रमांना मान्यता; १२० विद्यार्थिनींना प्रवेशाची संधी

देवगड : जामसंडे येथील विद्या विकास मंडळ संचलित श्रीमती नीता नीलकंठ  दीक्षित महिला महाविद्यालयाला एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाची शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून बी.एस्सी. होम सायन्स अभ्यासक्रमासाठी प्रथम संलग्नता (First Time Affiliation) प्राप्त झाली असून, पोषणशास्त्र व आहारशास्त्र (Nutrition and Dietetics), संसाधन व्यवस्थापन व अंतर्गत सजावट (Resource Management and Interior Design) तसेच वस्त्रशास्त्र व फॅशन डिझाईन (Textile Science and Fashion Design) या विशेष शाखांना मान्यता मिळाली आहे. १२० विद्यार्थिनींच्या प्रवेशक्षमतेसह हे महिला महाविद्यालय १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. अजित गोगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अॅड. गोगटे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने काही महिन्यांपूर्वी प्रत्येक तालुक्यासाठी नवीन महाविद्यालयांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्याअंतर्गत देवगड तालुक्यासाठी एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. विविध समित्यांच्या पाहण्या, त्रुटींची पूर्तता आणि विद्यापीठाच्या प्रक्रियेनंतर ३० जून २०२६ रोजी शासनाने मान्यता दिली आणि त्यानंतर विद्यापीठाकडून प्रथम संलग्नतेचे पत्र प्राप्त झाले.

यावेळी त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री नितेश राणे आमदार प्रमोद जठार तसेच संबंधित अधिकारी व विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निरंजन दीक्षित यांनी प्रारंभी ४० लाख रुपयांची देणगी दिली असून त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ महाविद्यालयाचे ‘श्रीमती नीता नीलकंठ दीक्षित महिला महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अॅड. गोगटे यांनी सांगितले की, कोकण विभागात बी.एस्सी. होम सायन्स अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिले एस.एन.डी.टी. संलग्न महिला महाविद्यालय ठरणार आहे. पोषणशास्त्र व आहारशास्त्र या शाखेसाठी १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थिनी पात्र असतील, तर संसाधन व्यवस्थापन व अंतर्गत सजावट तसेच वस्त्रशास्त्र व फॅशन डिझाईन या शाखांसाठी कला, वाणिज्य, विज्ञान तसेच एमसीव्हीसी शाखेतील विद्यार्थिनींनाही प्रवेश घेता येणार आहे.

महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत उभारण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. आवश्यक अध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू असून दर्जेदार शिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांसाठी असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती व फी परतावा योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता असून, शुल्क संरचना विद्यापीठाच्या मंजुरीनंतर जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष अँड. अजित गोगटे, अँड. अभिषेक गोगटे, नव्या महाविद्यालयाच्या प्राचार्य विमल बलवान डी.बी. बलवान शाला मुख्याध्यापक जाधव सर, माजी मुख्याध्यापक अरुण सोमण, संस्थेचे पदाधिकारी श्री प्रवीण जोग, संतोष कुलकर्णी अन्य मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page