Headlines

गायरान जमिनीवर काळ्या दगडाच्या खाणीला आमचा विरोध…

सरपंच संघटना यांची भूमिका: वेळ पडल्यास आंदोलन छेडू..

⚡दोडामार्ग ता.१८-: दोडामार्ग तालुक्यातील गायरान जमिनीवर प्रस्तावित काळ्या दगडाच्या खाण व दगडापासून रेती निर्मिती प्रकल्पाला दोडामार्ग तालुका सरपंच संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दोडामार्ग तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, माटणे विभागाचे शिवसेना विभागप्रमुख तसेच झरेबांबर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल शेटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही भूमिका स्पष्ट केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्यातील एका व्यक्तीने गायरान जमिनीवर खाण प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमीन मागितली आहे. त्यानुसार महसूल विभागाचे अधिकारी संबंधित जागेची पाहणी करण्यासाठी आले होते. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी एकत्र येऊन या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला.
याबाबत बोलताना अनिल शेटकर म्हणाले, “आम्हाला विकास हवा, चांगले प्रकल्प हवेत आणि स्थानिकांना रोजगारही मिळावा, अशी आमची भूमिका आहे. मात्र पर्यावरणाचा ऱ्हास करणारा व गावाच्या भवितव्याला धोका निर्माण करणारा कोणताही प्रकल्प आम्हाला मान्य नाही. गायरान जमीन ही गावाची सामूहिक संपत्ती असून तिचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “स्थानिकांच्या इच्छेविरुद्ध हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
सरपंच संघटनेने प्रशासनाला आवाहन केले आहे की, स्थानिक नागरिकांच्या भावना आणि पर्यावरणीय परिणामांचा गांभीर्याने विचार करून गायरान जमिनीवरील प्रस्तावित खाण प्रकल्प रद्द करावा. पर्यावरणाचे संरक्षण आणि गावाच्या हिताला प्राधान्य देतच विकासाचे निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

You cannot copy content of this page