मंदार शिरसाट यांचा आंदोलनाचा इशारा :NCMC नोंदणी केंद्रावर नागरिकांची होतेय गैरसोय..
⚡कुडाळ ता.१८-: राज्य परिवहन महामंडळाकडून महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर सवलतधारक प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. पण या कार्डसाठीच्या कुडाळ बस स्थानकावर जे नोंदणी केंद्र उभारण्यात आलं आहे त्याठिकाणी गैरसोय असल्याच्या तक्रारी वाढत आहे. कुडाळ बस स्थानकाच्या पार्सल बुकिंगच्या ऑफिसमध्ये अगदी गैरसोयीच्या जागी हे नोंदणी कार्यालय सुरु करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरीक, महिला आणि दिव्यांग बांधवांची गैरसोय होत आहे. हि गैरसोय दूर करून एसटी बसस्थानकात नोंदणीची व्यवस्था करावी अन्यथा युवा सेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने NCMC अर्थात National Common Mobility Card स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया डिजिटल, पारदर्शक आणि सोपी करणे हा आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर सवलतधारक प्रवाशांसाठी हे स्मार्ट कार्ड उपलब्ध आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्ड घेण्यासाठी नोंदणी केंद्रावर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, विद्यार्थी यांची गर्दी होऊ लागली आहे.
कुडाळ बस स्थानकात पार्सल ऑफिस मध्ये हे नोंदणी कार्यालय एका एजन्सी मार्फत सुरु आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते. बाजूलाच पाण्याची टाकी आहे. त्याच्यावरचे झाकण धोकादायक स्थितीत आहे. स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग बांधव दूरदूर वरून येतात. त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी गैरसोयीच्या आहेत. तोल जाऊन अपघात होण्याची देखील शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत पण त्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. सकाळी साडेनऊ वाजता येणाऱ्या नागरिकांची साडेबारा वाजले तरी नोंदणी होत नाही. रांग वाढत जाते. उना पावसात माता भगिनी, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग बांधवाना ताटकळत उभे राहावे लागते. घरची कामे टाकून, शेतीची कामे टाकून या स्मार्ट कार्डसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. ज्यांच्या नावावर हि एजन्सी आहे त्यांचा इथे ठावठिकाणा आढळत नाही. एसटी बुकिंग ऑफिस मधील कर्मचारीच हे काम करताना आढळतात. या गोष्टीबद्दल नागरिक आणि नगरसेवक मंदार शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हे ठिकाण अन्यत्र हलवा नाहीतर युवा सेना आणि ठाकरेसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.
