उपजिल्हा रुग्णालयात नियोजन बैठक संपन्न १०० डॉक्टर, ३० तज्ज्ञांची उपस्थिती; पाच हजार रुग्ण तपासणीचे उद्दिष्ट..
⚡सावंतवाडी, ता.१६-: माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त २० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. के.एल.ई. हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबिरात तब्बल १०० डॉक्टर, त्यापैकी ३० तज्ज्ञ डॉक्टर विविध आजारांवर मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले की, या शिबिरात बालशल्यचिकित्सा (Pediatric Surgery), अस्थिरोग (Orthopedic), कान-नाक-घसा (ENT), न्युरो, कार्डिओलॉजीसह विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. आवश्यक रुग्णांवर पुढील उपचारही मोफत करण्यात येणार असून, त्यासाठी के.एल.ई. हॉस्पिटलचे पीआरओ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवून पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमातून सुमारे पाच हजार रुग्णांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, के.एल.ई.चे डॉ. अलम प्रभू, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वप्नील मालखेडे, रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी, आबा केसरकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, शरद धाऊसकर आदी उपस्थित होते.
