उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक गणेश कुशे यांची नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याकडे मागणी
*💫मालवण दि.३१-:* मालवण शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार वाढतच चाललेला आहे या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातन १०० बेडचे कोविड सेंटर सुरु करावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक गणेश कुशे यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नगरपरिषदेकडे दिलेल्या निवेदनात श्री वराडकर आणि कुशे यांनी म्हटले आहे की, मालवण शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना कोविड -19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार वाढतच चाललेला आहे. सद्यस्थती विचारात घेता शहरामध्ये दररोज ५० पेक्षा जास्त रूग्ण मिळत आहेत. तर तालुक्यामध्ये आज १५१ रूग्ण मिळालेले आहेत. तसेच अॅक्टीव्ह रूग्णांची संख्याही जास्त आहे. शासकीय कोविड सेंटरची मर्यादा लक्षात घेता मालवण शहरामध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून १०० बेडचे कोविड सेंटर सुरु करणे आवश्यक आहे. शहरातील एखादय़ा शाळेमध्ये अशाप्रकारचे कोविड केअर सेंटर सुरु करता येणे शक्य आहे. तरी तातडीने वरील बाबीचा योग्य तो निर्णय घेऊन सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन याबाबत कार्यवाही व्हावी, असेही श्री. वराडकर व कुशे यांनी म्हटले आहे.
