वेंगुर्ला आडेली आंबेडकरनगर येथील नवीन सार्वजनिक विहिर अपूर्ण कामाबाबत ग्रामस्थांनी घेतली सभापतींची भेट…

भरावाचे काम योग्य पद्धतीने न झाल्यास “विहिरीत उतरून आंदोलनाचा” ग्रामस्थांचा इशारा..

⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली आंबेडकरनगर येथील सार्वजनिक विहिरीचे काम पावसाळा तोंडावर आला असतानाही गेल्या अडीज दिवसापासून बंद अवस्थेत असल्याने आडेली आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर कैफियत मांडली. सभापती यांची आडेली आंबेडकरनगर येथील ग्रामस्थ उदय आडेलकर, सुभाष आडेलकर, बाबुराव आडेलकर आदी ग्रामस्थांनी भेट घेऊन काम लवकरात लवकर सुरु करून योग्यरीतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली.
यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता श्री. शिंदे हे उपस्थित होते.
त्यानंतर सभापती शंकर घारे यांनी संबंधित ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता श्री. शिंदे यांना गुरुवारी दुपारी त्वरित संबंधित ठेकेदारास काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु गुरुवारी संबंधित कामाच्या ठिकाणी कोणतेही कामगार उपलब्ध झाले नसल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान पावसाळा तोंडावर आला असून हे विहिरीचे काम जलदगतीने होणे आवश्यक होते. दगडाचे बांधकाम करण्यापूर्वी साईडच्या भगदाडमध्ये माती तसेच जांभा दगड यांचा योग्य भराव होणे आवश्यक आहे. केवळ बांधकाम करण्यापूर्वी हे भगदाड जांभा दगडाने योग्यरीत्या न बुजविल्यास पुढील कालावधीत कोणतीही हानी होऊ शकते अथवा शासनाचा निधी पाण्यात जाऊ शकतो. त्यामुळे हे काम पूर्ण करताना योग्यरीत्या न केल्यास आडेली आंबेडकरनगर येथील 40 वंचित कुटुंबासह एकत्र येऊन विहिरीत उतरून अथवा विहिरीनजिक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी शासनास दिला आहे.

You cannot copy content of this page