माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा आरोप..
⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहरात पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेली विकासकामे आणि २१ निविदा प्रक्रिया सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर रद्द केल्या आहेत. केवळ ठेकेदारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न असून, यामुळे आचरा रस्ता, मराठा मंडळ रस्ता, परबवाडी यांसह ११ प्रमुख रस्त्यांची कामे रखडली आहेत. जनतेला खड्ड्यांच्या रस्त्यातून प्रवास करायला लावणाऱ्या या परिस्थितीला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची टीमच जबाबदार आहे, असा आरोप माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केला. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक संजय कामतेकर आणि नगरसेविका मेघा गांगण उपस्थित होत्या.
पुढे श्री. हर्णे म्हणाले की, खासदार नारायण राणे यांच्या सूचनेनुसार व व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार मुख्य चौकातील विद्रुपीकरण बदलण्यासाठी १ कोटी ५० लाखांचा निधी नोव्हेंबरमध्ये मंजूर झाला होता. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून हा निधी दिला आहे. मात्र, नगराध्यक्ष संदेश पारकर हे श्रीधर नाईक चौक येथील उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्याचे सांगत आहेत. मुळात महामार्ग प्राधिकरणाकडून केवळ सुशोभीकरणाची परवानगी असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार तिथे कोणतेही पक्के बांधकाम करता येणार नाही. मग जाहीर केलेल्या घोषणा नियमात बसतात का? असा सवाल श्री. हर्णे यांनी केला आहे. तसेच, हा निधी नरडवे नाका येथील सुशोभीकरणासाठी वळवू नये, कारण महामार्ग प्राधिकरणाला तेथील विकासासाठी आधीच निधी दिला गेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बंडू हर्णे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत, आता पटवर्धन चौकात जी नवीन दुकाने होत आहेत, त्यांचे हप्ते आहेत का? असा थेट सवाल देखील उपस्थित केला. तसेच, आधी उड्डाणपुलाखालील भाग विकसित करण्याची मागणी करणारे शहरातील व्यापारी आता काहीच बोलताना दिसत नाहीत, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
नियमबाह्य पद्धतीने निविदा रद्द करण्याच्या ठरावाविरोधात मुख्याधिकाऱ्यांनी दाद मागण्याची गरज होती, असे सांगत हर्णे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला असूनही सत्ताधाऱ्यांनी कामे रद्द केली. या संपूर्ण प्रकरणाबाबत मुख्याधिकाऱ्यांना देखील मंत्री नितेश राणेंना उत्तर द्यावे लागेल. या विरोधात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.
