एसटीच्या धडकेत होमगार्ड गंभीर जखमी..
⚡कणकवली ता.२१-: मुंबई – गोवा महामार्गावरील वागदे पेट्रोल पंपा समोरील सर्कल पॉईंटवर एक भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडत असलेल्या युनिकॉर्न मोटरसायकलस्वाराला मालवणहून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात कृष्णा साटम (रा. निरोम) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, तो होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. त्याला उपचारासाठी तात्काळ कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा साटम हा आपल्या मोटरसायकलने वागदे येथील सर्कल पॉईंटवर रस्ता ओलांडून जात असताना कसालहून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या मालवण-कणकवली बस (क्र. एमएच १४ बीटी १७९४) त्याला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, घटनास्थळी बस साधारणपणे ५० फूट फरफटत गेल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सदर बसला एकाच बाजूचे ब्रेक लागू होत असल्यामुळेच बस उजव्या बाजूने फरफटत गेल्याच्या निशाण्या रस्त्यावर दिसत होत्या, अशी चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये रंगली होती.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, प्रणाली जाधव, बी. एस. डी. साबळे आदी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
