⚡सावंतवाडी ता.१६-: आरवली सखेलखोल परिसरात श्री देव वेतोबा, सातेरी, भुमैया कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली.
या सोहळ्याला भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. एवढेच नाही तर विशालजी परब यांनी प्रत्यक्ष एका बैलगाडीवर स्वार होऊन स्पर्धकांना प्रोत्साहीत केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या बैलगाडा चालकांनी वेग, कौशल्य आणि समन्वय यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. संपूर्ण मैदानात थरारक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्यासमवेत सावंतवाडी भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, विकास परब, गिरिष परब, अमित प्रभू, सुशील कामटेकर, कुणाल वाटजी, रामदास परब, ओंकार गोवेकर, किरण कळसुळकर, राहूल मेस्त्री आदी उपस्थित होते.
माझा राजा रे माझा सर्जा रे असा घोष देत अनेक सर्जा राजाच्या जोड्या या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या शर्यतीमुळे ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांना चालना मिळत असून, युवकांमध्येही या क्रीडा प्रकाराबद्दल नवचैतन्य निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आयोजकांच्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
