⚡देवगड ता.१४-: पंचायत समिती देवगड छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. कार्यक्रमादरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेल्या अतुलनीय बलिदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
सभापती गणेश राणे यांनी आपल्या मनोगतात छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे संघर्ष, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वराज्याचे रक्षण करत हिंदवी स्वराज्याची पताका उंच ठेवली. युवकांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेत राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेची भावना जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास पंचायत समिती देवगडचे कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , कृषी अधिकारी दिगंबर खराडे , अधिक्षक मेधा राणे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
*पंचायत समिती देवगड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी…
