⚡मालवण ता.१२-:
आचरा गावात गेले काही दिवस सुरु असलेल्या विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला होता. यातच शनिवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे आचरा भागातील वीज समस्येने उग्र रूप धारण केले होते. तर ऐन आठवडा बाजारादिवशीच रविवारी बाजारपेठेतली लाईट नसल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले. यामुळे आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी आचरा बाजारपेठ येथील विद्यूत मंडळ कार्यालयावर धडक देत वीज मंडळ अधिकाऱ्यांना वीज समस्यांचे तातडीने निवारण करण्याच्या सुचना केल्या.
यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, उपसरपंच संतोष मिराशी,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, बाबू कदम, चंदू कदम, सुरेंद्र कुबल आदी उपस्थित होते.
विद्यूत लाईनवर आलेली झाडे तोडणी करण्यासाठी तातडीने उपाय योजना करा, मदतीसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करु. मात्र वीज समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे फर्नांडिस यांनी सांगितले. यावेळी उपस्थित विजमंडळाचे अधिकारी वर्मा, गावकर, शिंदे यांनी आम्ही वीज समस्या निवारण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र काही वेळा दोष हा एकदम सुक्ष्म असल्याने तो मिळण्यास वेळ लागतो. यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी विलंब लागतो. याबाबत ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त केली.
आचरा तिठा येथे वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
उन्हाळी सुट्टीमुळे आचरा गावात वाहनांमध्ये वाढ झाली आहे. यातच रस्त्याकडेला वेडीवाकडी वाहने उभी करून ठेवत असल्याने आचरा तिठा येथे कायम वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे याबाबत आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी आचरा पोलीस स्टेशनला भेट देत आचरा तिठा येथे वाहतूक पोलीस किंवा पोलीस नेमण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, उपसरपंच संतोष मिराशी, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, जयप्रकाश परुळेकर, बाबू कदम आदी उपस्थित होते.
