खा. नारायण राणे:भाजपाचे महामंत्री तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार विनोद तावडे यांचा भाजपच्यावतीने सत्कार..
⚡कणकवली ता.१२-:
दिल्लीच्या वातावरणात काम करणं आणि राहणे सर्वांनाच शक्य नसते. असे असताना , बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रातील नेतृत्व असलेल्या विनोद तावडे यांनी इतिहास घडवला. खा. विनोद तावडे हे पश्चिम बंगाल मधील बंदूकीच्या गोळ्यांना घाबरले नाहीत. पश्चिम बंगालमध्ये जावून त्यांनी चांगले काम केलं आहे. बंगाल जिंकल्याचा अभिमान आहे. भाजपा पक्षाला विजय मिळवून देण्यात जेजे शिलेदार होते त्याच्यात महत्वाची कामगिरी खा. विनोद तावडे यांनी केली आहे.देश महासत्ता बनेल असे काम करण्यासाठी विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते निर्माण व्हावेत. विनोद तावडे यांचा सत्कार म्हणजे त्यांच्यातील नेतृत्व गुण व कार्य कार्यकर्त्यांनी आत्मसात करण्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले.
कणकवली येथील प्रहार भवन येथे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार तथा भाजपा महामंत्री विनोद तावडे यांचा भाजपच्यावतीने आयोजित सत्कार खा. नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खा. राणे बोलत होते. यावेळी भाजप राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार विनोद तावडे यांचा सत्कार समारंभ प्रसंगी व्यासपीठावर,पालकमंत्री नितेश राणे,आमदार प्रमोद जठार, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,माजी आम. अजित गोगटे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,जिल्हा बॅक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, लखमराजे भोसले,अशोक सावंत,संदीप साटम, मिलिंद मेस्त्री, शाम काणेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
खा.नारायण राणे म्हणाले, भाजपच्या वतीने विनोद तावडे सत्कार सोहळ्यासाठी आम्ही सर्वजण जमलो आहोत. खा. विनोद तावडे यांचा सत्कार हा कौतुकाचा आहे. खा.तावडे आणि आ.जठार यांचा सत्कार करतो हा गुणात्मक आहे.त्यांनी यापेक्षा चांगले काम करावे.जिल्ह्याचा माणूस पुढे जातो,यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. या सत्कारामुळे प्रेरणा आणि जोश निर्माण होईल. विनोद तावडे यांचे माझे चांगले संबंध होते.दिल्लीत केव्हाही राज्यातील तक्रारी केल्या नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी दर महिन्याला एकदा बसायचे ठरवले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात एकही काम राहणार नाही. विनोद तावडे यांना कोणतेही काम दिले तरी ते करुन दाखवतात हा त्यांचा गुण आत्मसात करण्यासारखा आहे.असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
बॉक्स
*अगदी जमिनीवरच्या कार्यकर्त्याला सन्मान देण्याचे काम भाजप करते;खा. विनोद तावडे
सत्काराला उत्तर देताना खा. विनोद तावडे म्हणाले, मी हा सत्कार मानत नाही,तर माझ्या गावाकडच्या लोकांनी दिलेल्या शुभेच्छा आहे.आणखीन जबाबदारीने काम करण्यासाठी आहे.देशपातळीवर काम करत असताना एक वेगळी ताकद असते.मंत्री होण्यापेक्षा महामंत्री म्हणून काम करण्याचा आनंद आहे.राज्याचे राजकारण करीत असताना मी खूप शिकलो,आता देशात काम करताना खूप आनंद मिळतो.कार्यकर्ता हा सन्मानाचा भुकेला आहे.कार्यकर्त्याला प्रेम देता आले पाहिजे.त्यावेळी राजकीय मतभेद होते,मात्र मैत्री राणे यांच्यासोबत कायम राहिली. मुख्यमंत्री ठरवण्याच्या टीममध्ये आता मी जात असतो.
पश्चिम बंगालमध्ये शपथ घेताना डोळ्यात अश्रू आले आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या त्यागाचा विजय आहे.बंगाल जिंकल्यामुळे घुसखोरी थांबणार आहे. आज मी राज्य सभेत आहे, नारायण राणे हे लोकसभेत नेतृत्व करीत आहेत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आहेत आणि विधानसभेत प्रमोद जठार करीत आहेत, आम. निलेश राणे हे घटक पक्षाचे आहेत.त्यामुळे आपण सिंधुदुर्गच्या विकासासाठी महिन्यातून एकदा एकत्र आलो पाहिजे.पुढील 5 वर्षाचा विकासाचा रोडमॅप बनवला पाहिजे.कुठे अडल काय ते पाहू,ज्यावेळी विकास होईल तरच सत्कार हा सत्कारणी लागेल. मासिक बैठक झाली त्यात विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत होईल.असे खास. विनोद तावडे म्हणाले.
भाजप पक्षात कार्यकर्त्याला सन्मान दिला जातो याची अनेक उदाहरणे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सारखी सर्वसामान्य कुटुंबातील महिला भाजपच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपती होऊ शकल्या. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची निवड करण्यात आली.अगदी जमिनीवरच्या कार्यकर्त्याला सन्मान देण्याचे काम भाजपने केले आहे यातूनच काम करण्याची प्रेरणा मिळते. असे खास.विनोद तावडे म्हणाले.
भाजप पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी आजपर्यंत नाकारलेली नाही असे सांगताना खास. विनोद तावडे म्हणाले, पक्ष संघटनेतील पद हे महत्वाचे मानणारा मी आहे. खासदारकीपेक्षा मला पक्षाचे सरचिटणीस पद मला मोठे वाटते कारण संघटना मानणारा मी कार्यकर्ता आहे. पुढील काळात उत्तरप्रदेश, पंजाब व इतर राज्यात निवडणुका होणार याची जबाबदारी पार पाडून ही राज्ये भाजपच्या झेंड्याखाली आणायची आहेत असे खास. विनोद तावडे म्हणाले.
बॉक्स
*कोकणासाठी आताचा सुवर्णकाळ; पालकमंत्री नितेश राणे
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले,
आपण आज राजकारणात आणि समाजकारणात आहात,खा.नारायण राणे आणि सत्कारमूर्ती विनोद तावडे यांचे गुण आत्मसात करण्याची गरज आहे. देशात खा.विनोद तावडे यांना काम करताना पाहतो,तेव्हा आमची कॉलर टाईट होते. खा.विनोद तावडे आणि खा.नारायण राणे यांचे पूर्वी पासून संबंध चांगले आहेत.आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे विनोद तावडे आहेत. त्यांच्या कुणकवण गावाबाबतीत त्यांचे बारीक लक्ष असते.त्यांच्या रूपाने एक चांगले खासदार मिळाले आहेत.आता प्रमोद जठार यांच्या रूपाने बुस्टर डोस मिळाला आहे.कोकणासाठी आताचा सुवर्णकाळ आहे.आता आमच्या कोकणाच्या विकासाला कोणीही थांबवू शकत नाही.अशी आपली ताकद निर्माण झाली आहे. असे ना. नितेश राणे म्हणाले.
बॉक्स
आ. प्रमोद जठार म्हणाले ,मला आमदारकी मिळण्यासाठी खास. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातून माझे नाव सुचविले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडक नावे पाठविली मात्र दिल्लीत माझ्या नावासाठी विनोद तावडे यांनी वजन वापरले त्यामुळे मी आमदार झालो असे सांगताना आम. प्रमोद जठार म्हणाले,शिक्षण मंत्री असताना विनोद तावडे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.निष्ठावंतचे महामेरु विनोद तावडे आहेत.आगामी काळात हिंदुस्तानचे नेतृत्व विनोद तावडे करतील. असा विश्वास प्रमोद जठार म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले,खा.विनोद तावडे हे उत्तम संघटक आहेत,त्यांचे काम आम्ही पाहिले आहे.अनेक ठिकाणी त्यांनी भाजपची सत्ता आणून दिली.
संघटन मंत्री शैलेंद्र दळवी म्हणाले, कुठल्याही कार्यकर्त्याला अंडर एस्टिमेंट करुन चालत नाही,त्याचे उदाहरण म्हणजे खा.विनोद तावडे आहेत.
माजी आमदार अजित गोगटे म्हणाले, माझ्या आमदारकीच्या कालावधीत खा.विनोद तावडे यांनी मेहनत घेतली. भाजपच्या चढत्या आलेखात खा.तावडे शिलेदार आहेत.
प्रास्ताविक करताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले,सिंधुदुर्गातील नेते आता अनेक मोठ्या पदांवर आहेत.खा.विनोद तावडे हे आता देशातही काम करत आहेत.राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महामंत्री काम करत आहात.आपल्या कार्यकृत्वाचा आम्हाला अभिमान आहे.एकनिष्ठेचा,पक्ष निष्ठेचा विचार दिला.भाजप ८० टक्के सत्ता भाजपकडे आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम व आभार महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांनी मानले.
