ओरोस ता १
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी झोपडीला आग लावून नुकसान केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच पिडीत याला योग्य नुकसान भरपाई देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना दिले आहेत.
रमेश सुभाष जाधव, राहणार बाहेरचा वाडा, बाबु राजगुरू यांचे जागेत, सावंतवाडी हे कुटुंबासोबत १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी कोलुर एल. टी., मुददेबिहाल, राज्य-कर्नाटक येथे मुलाचे जावळ काढण्यासाठी गेले होते. २३ एप्रिल २०२३ रोजी त्याची सासू ललिता राठोड व त्याचा मेहुणा कृपेश हे सुदधा गावी आले होते. २९ एप्रिल २०२३ रोजी रात्री १.२५ वाजता त्याचा मित्र मोहनेश पवार याचा फोन आला की, त्याच्या प्लास्टीक कापड व कागदी पुठ्ठ्यांनी बनविलेल्या झोपडीला आग लागलेली आहे. त्यामुळे ते त्याच रात्री निघून सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान सावंतवाडीला त्याच्या झोपडीजवळ आले.
त्यावेळी संपूर्ण झोपडी जळालेली होती. त्यात १ टी.व्ही., १ सिलींग फॅन, १ टेबल फॅन, १ शिलाई मशिन, १ लोखंडी बेड, १ गादी, कपडे, भांडी, अन्नधान्य आणि कपाटात ठेवलेले रूपये ५० हजार रुपये असे आगीत जळाल्याचे त्याने सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे ३० एप्रिल २०२३ रोजी अज्ञात इसमाविरूदध फिर्याद दिली. त्यावरून सावंतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला. या गुन्हयाचा तपास पी.एस.आय. ए. जे. पाटील यांनी करून आरोपी गालीब चाँद कोंडी, राहणार कोकण कॉलनी, काजरकोंड, कोलगांव, ता. सावंतवाडी, मुळ राहणार सिंदगी, ता. सिंदगी, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक याचे विरूद्ध सावंतवाडी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ही केस सिंधुदुर्गनगरी येथील सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आली. या आरोपीने केसचे कामकाज पाहण्यासाठी मोफत वकील मिळावा म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचेकडे अर्ज केला होता. त्यावरून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एस. डी. गुंडेवाडी या काम पाहण्यासाठी मुख्य लोक अभिरक्षक अॅड. रामदास वागज यांना कळविले. त्याप्रमाणे ते हजर होऊन त्यांनी कामकाज पाहिले.
या केसची सुनावणी नुकतीच झाली. अभियोग पक्षाने एकुण ७ साक्षीदार तपासले. त्यामध्ये खबर देणारा रमेश जाधव, मोहनेश पवार, किर्ती जाधव, कृपेश राठोड आणि तपासिक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यांच्या साक्षी महत्वाच्या झाल्या. यात सरकार पक्षातर्फे प्रभारी लोक अभियोक्ता संदीप राणे यांनी युक्तीवाद केला की, आरोपी विरूद्ध भरपूर पुरावा आल्यामुळे तसेच एका साक्षीदाराने घटना स्थळावरून पळून जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपीला शिक्षा देण्यात यावी. आरोपी तर्फे मुख्य लोक अभिरक्षक अॅड. रामदास वागज यांनी युक्तीवाद केला की, साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती आहेत. तसेच खबर देणारे रमेश जाधव व त्याचा मेहुणा कृपेश राठोड व सासू ललिता राठोड यांनी आरोपीला मारहाण केल्याबद्दल आरोपीने त्यांचेविरूदध २०२२ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांना अटक होऊन त्यांचेविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. या गोष्टीचा राग धरून साक्षीदार यांनी आरोपी विरूध्द खोटेपणाने सांगितले. त्यामुळे आरोपीला निर्दोष सोडण्यात यावे, असे सांगितले.
न्यायाधीश यांनी सर्व पुराव्यांची छाननी करून आरोपीची संशयाचा फायदा घेऊन निर्दोष मुक्त करण्यात आले. तसेच जरी आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असली तरीही पिडीत व्यक्तीस सी.आर.पी.सी. ३५७ अ प्रमाणे योग्य नुकसान भरपाई देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांना देण्यात आलेले आहेत. या खटल्यामध्ये अभियोग पक्षातर्फे प्रभारी लोक अभियोक्ता संदीप राणे यांनी काम पाहिले. तसेच आरोपी तर्फे मुख्य लोक अभिरक्षक अॅड. रामदास वागज यांनी काम पाहिले. त्यांना उपमुख्य लोक अभिरक्षक, सिंधुदुर्ग अॅड. उल्का पावसकर, सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. श्वेता तेंडुलकर, सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. सुर्याजी खुने, सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. ऋचा लोखंडे सामंत यांनी सहकार्य केले.
झोपडीला आग लावल्याचा आरोपातून निर्दोष मुक्तता…!
