⚡कणकवली ता.०१-: प्रतिष्ठेच्या ‘नवनीत मास्टर स्ट्रोक’ चित्रकला स्पर्धेत विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीचा आठवीतील विद्यार्थी मोहित नीलकंठ सुतार याने जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नवनीत कंपनीतर्फे दरवर्षी जुलै महिन्यात राज्यभर ही स्पर्धा घेतली जाते. यावर्षी विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथील माध्यमिक, प्राथमिक व इंग्रजी माध्यमाच्या सुमारे ८५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. त्यापैकी शालेय स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या २२ विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या निवडक चित्रांमधून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मोहित सुतार याच्या चित्राची निवड झाली.
मोहितला शाळेचे कलाशिक्षक प्रसाद राणे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाईसाहेब तवटे यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक ए. व्ही. वनवे, शाळा पालक संघाचे अध्यक्ष श्री. सावंत तसेच सर्व विभागांचे शिक्षक उपस्थित होते.
