भोंदू बाबा प्रकरणाबाबत आमदार केसरकरांची चौकशी लावा..

चंद्रकांत कासार यांनी ठाकरे शिवसेनेच्या वतीने केली मागणी: केसरकारांनी विकास कामात ऐवजी फक्त भोंदूगिरी आणि बुवाबाजी करण्याचा काम केलंय..

⚡​सावंतवाडी,ता.२३-: भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे नेमके संबंध काय आहेत, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी घेतली आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केसरकरांवर जोरदार टीका केली. खरात प्रकरणात केसरकर यांची बाजू विसंगत वाटत असून, यामुळे ‘रामराज्य’ म्हणून ओळख असलेल्या सावंतवाडीचे नाव खराब होत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांना वंदन करून केसरकरांच्या चौकशीसाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही कासार यांनी यावेळी केली.
​या पत्रकार परिषदेला उबाठा शिवसेनेचे रमेश गावकर, राजू शेटकर, रमेश सावंत, विनोद काजरेकर, विनोद ठाकूर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कासार पुढे म्हणाले की, केसरकरांनी विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी केवळ निवडणूक आली की भोंदूगिरी आणि बुवाबाजीचा आधार घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. अशोक खरातसोबत त्यांचे फोटो समोर आले असून, इतरांनी दिलेला खुलासा आणि केसरकरांचा खुलासा यामध्ये मोठी तफावत जाणवत आहे. या प्रकरणात सत्तेतील ९ मंत्री सामील असल्याचे बोलले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो खरातसोबत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला घेऊन जाण्यात आणि खरातच्या संपर्कात आणण्यात केसरकर यांचाच हात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
​दरम्यान, आम्ही कोणत्याही प्रकारच्या भोंदूगिरीचे समर्थन करत नाही, मात्र या प्रकरणातून समोर आलेले महिलांचे शोषण आणि इतर प्रकार अत्यंत घातक आहेत, असे कासार यांनी स्पष्ट केले. जर या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि योग्य रितीने झाला, तर अनेक बड्या नेत्यांची नावे समोर येतील, असा दावाही त्यांनी केला. उबाठा शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या खरातसोबत असलेल्या फोटोंबाबत विचारले असता, त्याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. मात्र, सावंतवाडीचे मतदार म्हणून केसरकरांमुळे शहराची जी बदनामी होत आहे, ती रोखण्यासाठी आम्ही त्यांच्या चौकशीची मागणी करत आहोत, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page