देवगड मध्ये आमदार निलेश राणे वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा..
⚡देवगड ता.१७-: शिवसेना कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यात धार्मिक व समाजाभिमुख अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पवित्र तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथे अभिषेक करून भक्तीमय वातावरणात प्रार्थना करण्यात आली, तर देवगड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून समाजसेवेचा उपक्रमही राबवण्यात आला.
कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर मंदिरात विधीवत अभिषेक करण्यात आला. आमदार निलेश राणे यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात अधिक यश लाभो असे साकडे कुणकेश्वर शंभू महादेवा चरणी घालण्यात आले.
या धार्मिक कार्यक्रमाला देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, तुषार गावकर, अण्णा चव्हाण, प्रमोद आंबेरकर, ऋषी चव्हाण, नानेरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच पार्श्वभूमीवर देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप देखील करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती सभापती गणेश राणे, शिवसेना तालुका प्रमुख तथा उपसभापती अमोल लोके, देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, युवा सेना तालुका प्रमुख दिनेश गांवकर, विभागप्रमुख दिनेश पारकर, साईनाथ काळे, देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटोदेकर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील आदी उपस्थित होते.
