कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास..
⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-:
बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही! सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे. आंबा आणि काजू पिकाचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. माझ्या सूचनेनंतर ९० टक्के नुकसान झाल्याचा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर झाला आहे. नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक व अन्य प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर मी बैठक घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेतली आहे. शब्दापलीकडे कृती करून सरकार आंबा व काजू बागायतदारांना न्याय देईल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी बागायतदारांच्या मोर्चास सामोरे जात दिला.
सिंधुदुर्ग नगरी येथे शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्गातील आंबा काजू बागायतदारांचा मोर्चा नुकसान भरपाई च्या मागणीसाठी जिल्हाधिकारी भावनावर जातात राज्याचे मंत्री पालकमंत्री नितेश राणे आंदोलनाच्या व्यासपीठावर दाखल झाले. या मोर्चात सहभागी झालेले आंबा काजू बागायतदार ही माझ्या जिल्ह्यातील जनता आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय मी सहन करणार नाही. नुकसान भरपाई साठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहेत. अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई बाबत दिलेला चुकीचा अहवाल मी बदलून घेतला आहे. जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांनी जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदारांच्या पिकाचे नव्वद टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. आंबा बागायतदार यांच्यावतीने राजू शेट्टी यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत एक तातडीची बैठक घेण्यात येईल. या बागायतदारांना पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही. शाळांच्या संच मान्यतेच्या प्रश्ना सोडविला त्या सारखा बागायतदारांचा हा प्रश्न सरकार सोडवेल. कोकणासाठी निकष वेगळे असावेत असाही विचार सरकार नक्की करेल. औषध व कीटकनाशक यामध्ये बागायतदारांची फसवणूक होऊ नये म्हणून सरकार निश्चित धोरण ठरवेल, यातील दलाल, औषध कंपन्या व वितरण साखळीवर कडक नियंत्रण ठेवेल, आंबा व काजू बागायतदारांना हेक्टरी व झाडांच्या प्रमाणात जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रयत्न करेल. मूळ बागायतदार मालक व कराराने बागा घेतलेले शेतकरी याबाबतही समन्वय घडवण्यासाठी मी पालकमंत्री म्हणून प्रयत्न आवश्य त्या वेळी प्रयत्न करेन किंवा सरकारमार्फत जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी बागायतदारांच्या या मोर्चात दिली.
कर्जमाफी बाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने व्याजाची सवलत जाहीर केली आहे. याबाबत सरकार दिलासादायक निर्णय घेईल. याबाबतचा शासन निर्णय लवकरच होईल. याशिवाय विमा कंपन्या, औषध कंपन्या यांचीही जिल्हास्तरावर बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास या मोर्चात मंत्री नितेश राणे यांनी दिला. पालकमंत्री नितेश राणे यांनी मोर्चाला सामोरे जात बागायतदारांना विश्वास दिल्यामुळे त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. स्वतः सरकार या मोर्चाला सामोरे आल्याने राजू शेट्टी यांनी मंत्री नितेश राणे व सरकारचे कौतुक केले
