जल जीवन मिशन अंतर्गत परुळेबाजारचा सन्मान…

ओरोस ता १०
जल जीवन मिशन अंतर्गत महिला दिना 8 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण देशभर राष्ट्रीय जल महोत्सव साजरा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने या महोत्सवासाठी राज्यस्तरावर नामांकन मागविण्यात आले होते. त्यामध्ये १०० टक्के वापरकर्ता शुल्क वसुलीद्वारे आर्थिक शाश्वतता साधणारी गाव व गावाची नळपाणी योजना आखण्यात सरपंच यांचा असणारा वाटा या घटकांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार गावाची निवड करण्यात आली आहे. ११ मार्च रोजी राष्ट्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमात ग्रामपंचायत परुळेबाजार सरपंच प्रणीती आबंडपालकर यांना सहभागी होण्याचा सन्मान मिळाला आहे.
जल जीवन मिशन हा ग्रामीण भारतासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असून प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला गुणवत्तापूर्ण, नियमित, पुरेसे व शाश्वत पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यात जल महोत्सव हा विशेष पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. सध्याच्या काळात पाणी ही केवळ पायाभूत बाब राहिलेली नसून ती ग्रामीण जीवनपद्धती, स्थानिक परंपरा, उपजीविका आणि सामुदायिक संस्कृतीशी घट्ट जोडलेली जीवनरेखा बनली आहे. जल जीवन मिशन आता केवळ पायाभूत सुविधा उभारणीपुरते मर्यादित न राहता सुरक्षित व नियमित पाणीपुरवठ्याच्या शाश्वत व्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे.
ग्रामपंचायत परुळेबाजार यांचा हा सन्मान जल जीवन मिशन अंतर्गत योजनांचे दीर्घकालीन संचालन, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे योग्य नियोजन तसेच जलसाक्षरता आणि लोकसहभागाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. इतर गावांनीही परुळेबाजारचा आदर्श घ्यावा, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page