प्रा. डॉ. व्ही. जी. भास्कर:’असा मी असामी’ कार्यक्रमातून उलगडला भास्कर सरांचा जीवनपट,काळासोबत चालण्याचा विद्यार्थ्यांना दिला सल्ला..
⚡कुडाळ ता.२१-: संत राऊळ महाराज महाविद्यालयात ३५ वर्ष सेवा केली. या महाविद्यालयाने, संस्थेने, सहकारी प्राध्यापक-कर्मचारी, विद्यार्थी यांच्यामुळेच माझी स्वतःची जडणघडण झाली. या महाविद्यालयाशी माझे अतूट नातं निर्माण झाले आहे. असे भावोद्गार संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. जी. भास्कर यांनी काढले. महाविद्यालयाच्या वाङमय चर्चा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘असा मी, असामी’ कार्यक्रमात ते बोलत होते.
महाविद्यालयाच्या वाङमय चर्चा मंडळाच्या वतीने आयोजित ‘असा मी, असामी’ कार्यक्रमाचे पहिलेच पुष्प आज गुंफण्यात आले. आजचे ‘असामी’ होते मार्चअखेर सेवानिवृत्त होणारे प्रा. डॉ. व्ही.जी. भास्कर. संवादक सोहम कुडाळकर आणि गायत्री सांगोलकर यांनी विचारलेल्या विविध प्रश्नाच्या आधारे डॉ. भास्कर यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उभा राहिला. डॉ. भास्कर यांनी सुद्धा आपल्या जीवनातील अनेक आठवणी अगदी ‘दिल खोलके’ सर्वांसमोर मांडल्या.
आपल्या बालपणापासून डॉ. भास्कर यांनी सुरवात केली. कोल्हापूर जिल्ह्यात कुडित्रे हे त्यांचे गाव. वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय. त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच. एक भाऊ आणि एक बहीण अशी भावंडे. हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी करून डॉ. भास्कर यांनी इतिहास विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या बंधूंची इच्छा होती कि डॉ. भास्कर यांनी शिक्षकी पेशात जावे. त्यांनी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाची प्राध्यापक भरतीची जाहिरात त्यांना दाखवली. डॉ. भास्कर कुडाळला आहे. मुलाखत झाली आणि १९९० मध्ये ते संत राऊळ महाराज महाविद्यलयात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
पण त्याआधी कॉलेज शिक्षणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, हॉस्पिटल मध्ये रात्रपाळीत काम करत असल्याने सकाळी कॉलेजला जायला उशीर व्हायचा. कामामुळे नियमित जायला मिळायचे नाही. याच गोष्टीमुळे आणि कॉलेजमध्ये कोणी त्यांना ओळखत नसल्याने एके दिवशी कॉलेजच्या गॅदरिंगला ते गेले तेव्हा गेटवर त्याना शिक्षकांनी हटकलं आणि कोण तू म्हणून विचारलं ! पण नियमित अभ्यास केल्यामुळे इतिहास विषय घेऊन ते एमए झाले.
कुडाळ कॉलेज मध्ये जॉईन झाल्यावर सुरुवातीला प्रा. महादेव कानशिडे हे प्राचार्य होते. त्यांनी फार उत्तम सहकार्य केले. पहिल्या तासावर जाताना थोडेसे दडपण होते. पण नंतर ते कमी झाल्याचे डॉ. भास्कर यांनी सांगितले. आपल्या परिवाराबद्दल बोलताना ते म्हणाले कि मी माझ्या पत्नीचा नेहमीच आदर करत आलेलो आहे. तिचे शिक्षण कमी आहे, पण तिला जाण चांगली आहे. तिला दहाविला चांगले मार्क होते सहज नोकरी मिळाली असती. पण तिने नाही केली. मी नेहमी तिचे ऐकतो. तिचा सल्ला घेतो.
डॉ. भास्कर यांचा सुशिक्षित परिवार आहे. मुलगा एमटेक इंजिनियर आहे, मुलगी सुद्धा इंजिनियर आहे. जावई आणि सून देखील उच्चशिक्षित असून सगळे आपापल्या नोकरी व्यवसायात चांगल्या प्रकारे स्थिरावले असल्याचे त्यांनी सांगितले. आपण आजोबा झाल्याचे देखील ते म्हणाले. कराची महाराष्ट्रीय शिक्षण मंडळ आपल्या कर्मचाऱ्यांची कशी काळजी घेते याची आठवण देखील आपल्या काही उदाहरणातून करून दिली. माजी पदाधिकारी विद्याधर वेतुरेकर आणि सध्याचे पदाधिकारी महेंद्र गवस यांचा त्यांनी वर्जून उल्लेख केला.
कॉलेजमध्ये सर्व सहकारी प्राध्यापक मित्र असले तरी प्रा. डॉ. आवटे यांच्याशी मैत्रीचे सूर अधिक जुळल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य पदाच्याकाळात सर्व सहकारी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि संस्थाचालक यांचे चांगले सहकार्य लाभले. याच काळात कॉलेजचे प्रवेशद्वार, कँटीन, गार्डन यासारख्या गोष्टी कॉलेजसाठी करता आल्या याचे समाधान असल्याचे डॉ. भास्कर म्हणाले.
आजच्या विद्यार्थ्यांनी काळासोबत चालणे गरजेचे आहे. नवनवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात करावे. या प्रवाहात टिकायचे असेल तर अभ्यास टाळून चालणार नाही, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
इतिहासाचे प्राध्यापक असल्याने इतिहासातील कोणत्या व्यक्तिरेखेला भेटायला आवडेल असे त्यांना विचारण्यात आल्यावर डॉ. भास्कर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांची नावे घेतली. यांच्यामुळेच आम्ही आज आहोत असे ते म्हणाले. प्रा. डॉ. शरयू आसोलकर मॅडम यांनी दिलेल्या एका पुस्तकामुळे आपल्याला पीएचडी करायची प्रेरणा मिळाल्याचे ते म्हणाले.
सेवानिवृत्ती नंतरच्या योजनांबद्दल बोलताना त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल रिसर्च करायच आहे असे सांगितले. त्याचबरोबर जो युरोपियन इतिहास मी शिकवला त्या युरोपचा दौरा करून ती ठिकाण पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच तबला वाद्य खूप आवडते. पण त्याचे शिक्षण घेता आले नाही. आता त्याचे प्रशिक्षण घेणार असल्याचे डॉ. भास्कर यांनी सांगितले. गायनाची आवड होती. कधीतरी स्टेजवर जाऊन गाणी म्हणायची इच्छासुद्धा होती. कुडाळ कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये ती इच्छा पूर्ण केल्याचे ते म्हणाले.
या ३५ वर्षांच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना शिकविले. त्यातले काही विद्यार्थी तर भविष्यात मित्रच बनले. सध्या कुडाळ कॉलेजमध्ये कार्यरत असलेले प्रा. संतोष वालावलकर हे त्यांचे विद्यार्थी नंतर त्यांचे खूप जवळचे मित्र बनले. प्रा. वालावलकर हे विद्यार्थी दशेत असताना त्यावर्षीचे आदर्श विद्यार्थी असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
सहलीच्या वेळी रात्रीच्या वेळी विद्यार्थी बस मधून उतरला आणि कोणाला काही समजायच्या पूर्वीच बस मात्र कुडाळला आली. त्या विद्यार्थ्याच्या जबाबदारीपोटी रात्रीच्या वेळी कशी त्याची शोधाशोध केली, याची आठवण त्यांनी सांगून शिक्षकांचे विद्यार्थ्यांप्रती कर्तव्य कसे असले पाहिजे यांची जाणीव करून दिली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय सोडून बसलेले असताना प्लॅटफॉर्मला लागणाऱ्या ट्रेन मध्ये पाय अडकले असते पण मित्राने मागे ओढले म्हणून पाय वाचले, तसेच रात्रीच्या वेळी अचानक नाग समोर आला, असे काही जीवावर बेतणारे प्रसंग देखील डॉ. भास्कर यांनी कथन केले.
कुडाळ म्हणजेच कोकण हि आपली कर्मभूमी आहे. नररत्नांची खाण असलेल्या निसर्गसंपन्न कोकणात आपल्याला काम करायला मिळाले हे आपले भाग्य असल्याचे डॉ. भास्कर यांनी सांगितले. आपल्या कारकिर्दीत ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केले त्या सर्वांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संवादकानी विचारलेल्या रॅपिड फायर राउंडला देखील सफाईने तोंड दिले. एसआरएम कॉलेज बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना एसआरएम जीव कि प्राण असल्याचे शेवटी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, प्रा. डॉ. अनंत लोखंडे, मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. शरयू आसोलकर, प्रा. डॉ. आवटे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
