अवैध वाळू वाहतूकप्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता…

⚡मालवण ता.२२-: हडी येथे अवैध वाळू वाहतूक तपासणीदरम्यान तत्कालीन तहसीलदार व महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून मारण्याचा प्रयत्न, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने चौघा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आरोपींच्यावतीने अॅड. स्वरूप नारायण पई व अॅड. यतिश खानोलकर यांनी प्रभावी काम पाहिले.

१६ जानेवारी, २०१९ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तत्कालीन मालवण तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकासह हडी येथील मार्गेश्वर मंदिर परिसरात अवैध वाळू वाहतूक तपासणी सुरू केली होती. यावेळी वाळू वाहतूक करणारा एक डंपर थांबवून त्याचा पंचनामा व चालकाचा जबाब नोंदविण्यात येत होता.

दरम्यान, अचानक तीन इसम घटनास्थळी आले व महसूल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू लागले. त्यातील एका इसमाने डंपरमध्ये चढून तो सुरू केला, डंपरमधील वाळू ओतली व डंपर घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. महसूल कर्मचाऱ्यांनी डंपर अडविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वेगात डंपर त्यांच्या अंगावर घातल्याने अधिकारी बाजूला झाले व डंपर घटनास्थळावरून पळून गेला. तहसीलदारांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भा.दं.वि. कलम ३०७, ३५३, ३७९, ३३६, २०१, ५०४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती मालवण पोलिसांनी गुंडू पोमन्ना राठोड (रा. चौके), अमोल हेमंत चव्हाण (रा. चौके), योगेश घनःश्याम भिसळे (रा. हडी) व गुरूप्रसाद जनार्दन आचरेकर (रा. हडी) यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासातील त्रुटी तसेच आरोपींच्यावतीने मांडण्यात आलेले युक्तिवाद विचारात घेऊन मे. जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांनी सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

You cannot copy content of this page