मालवण शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा…

रश्मीन रोगे यांची नगरपालिकेकडे मागणी..

⚡मालवण ता.१५-:
मालवण दांडी भागात तसेच संपूर्ण मालवण शहरात मोकाट गुरांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत मालवण नगरपालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे याप्रश्नी लक्ष घालून मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दांडी येथील नागरिक व पर्यटन व्यावसायिक रश्मीन रोगे यांनी मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर व उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून १५ दिवसात उपाययोजना न झाल्यास नाईलाजाने सुरक्षित स्थळ म्हणून मला कुटुंबासहित नगरपालिकेत स्थलांतर करावे लागेल, असा इशाराही दिला आहे.

मालवण शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. दांडी भागात मोकाट गुरांमुळे आम्हा नागरिकांना घरी देखील असुरक्षितता वाटत आहे. ही मोकाट गुरे कधीही थेट घरात प्रवेश करतात. गेली चार वर्षे मालवण नगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीत याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ क्लिप प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. परंतु नगरपालिकेकडून या समस्येचे निराकरण करण्यात आलेले नाही. प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतीनिधी निवडून आल्यामुळे या समस्येचा गांभीर्याने विचार त्यांच्याकडून होऊन मोकाट गुरांच्या प्रश्नी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील अशी आशा असून यासाठी १५ दिवसाची मुदत देत आहे. मात्र उपाययोजना न झाल्यास नाईलाजाने सुरक्षित स्थळ म्हणून मला माझ्या कुटुंबासहित नगरपालिकेत स्थलांतर करावे लागेल, त्यास सर्वस्वी नगरपालिका जबाबदार राहील, असे रश्मीन रोगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

याबाबत नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी मोकाट गुरांचा शहरातील संचार व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत आम्ही गांभीर्याने लक्ष देत असून लवकरच याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले. तर उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनीही मोकाट गुरांच्या मालकांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न करून उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.

You cannot copy content of this page