भाजपकडून अमेय विजय आरोंदेकर यांचे नाव चर्चेत..
⚡सावंतवाडी ता.१५-:
आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपकडून एक अभ्यासू, तरुण, संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून अमेय विजय आरोंदेकर यांचे नाव सध्या जोरदारपणे पुढे येत आहे. राजकीय व सामाजिक वारसा, वैयक्तिक कर्तृत्व आणि विकासाची स्पष्ट दृष्टी यांचा संगम असलेले अमेय आरोंदेकर हे नाव मतदारसंघात आशेचा किरण ठरत आहे.
४३ वर्षीय अमेय आरोंदेकर हे स्थापत्य अभियंता व विकासक असून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका आणि पदवीधारक आहेत. शिक्षणासोबतच त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातही अनेक वर्षे सक्रिय योगदान दिले आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी गावपातळीवर काम करताना प्रशासनाची सखोल जाण मिळवली असून, राजकारणातील दांडगा अनुभव आणि मतदारसंघाची बारकाईने ओळख हे त्यांचे मोठे भांडवल मानले जाते.विधानसभा निवडणुकीच्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत, धनशक्तीच्या विरोधात एकहाती लढत देत मोठे मताधिक्य मिळवण्यात अमेय आरोंदेकर यशस्वी ठरले होते. शांत, संयमी स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि तरुणाईला आकर्षित करणारी तडफदार शैली यामुळे त्यांनी भाजपमध्ये कमी काळात वेगळे स्थान निर्माण केले आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटात स्वीकारार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे.
“आपला गाव आणि संपूर्ण मतदारसंघ चुकीच्या हातात जाऊ नये, धनशक्तीमुळे तरुण पिढी अमली पदार्थ व व्यसनाधीनतेकडे वळू नये,” ही अमेय आरोंदेकर यांची ठाम भूमिका आहे. स्थानिकांनी आपली जमीन परप्रांतीयांना विकू नये, गेली दहा वर्षे रखडलेला विकास मार्गी लागावा आणि आरोंदा मतदारसंघाचा सर्वांगीण व नियोजनबद्ध विकास व्हावा, या उद्देशाने ते प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची तयारी दर्शवत आहेत.
राजकीय-सामाजिक वारशाची मजबूत पार्श्वभूमी
अमेय आरोंदेकर यांचे वडील कै. विजय अनंत आरोंदेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अभ्यासू, सुशिक्षित व कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. बी.ए. ऑनर्स शिक्षण घेतलेले विजय आरोंदेकर हे अनेक वर्षे ग्रामपंचायत सदस्य, आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य होते. उद्योजक म्हणून त्यांनी अनेकांना रोजगार दिला. सहकार क्षेत्रात त्यांनी विकास सोसायटी व दूध सोसायटीच्या माध्यमातून पंचक्रोशीत भरीव काम केले. सिंधू कॅशू मद्यार्क कारखाना, आरोंदा याची स्थापना करून स्थानिक रोजगारनिर्मितीची दूरदृष्टी त्यांनी दाखवून दिली. त्यांच्या कार्यकाळात आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघाचे नाव जिल्ह्याच्या अग्रस्थानावर नेण्याचे काम झाले.
आई वैशाली विजय आरोंदेकर या देखील बी.ए. ऑनर्स शिक्षित असून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्या आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्य, आरोंदा विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन तसेच अनेक वर्षे ग्रामपंचायत सदस्य राहिल्या आहेत.
बहीण डॉ. गौरी रघुनाथ तानावडे–आरोंदेकर या डॉक्टर असून त्यांनीही ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समिती सदस्य म्हणून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सर्वच गावात वाढता पाठिंबा
आरोंदा, सातार्डा, कवठणी, मडुरा, सातोसे आदी गावांमधून अमेय आरोंदेकर यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारही “अमेय तू निवडणूक रिंगणात असशील तर आम्ही मदत करू” असे जाहीरपणे सांगत असल्याने त्यांची स्वीकारार्हता अधिक ठळक होत आहे.
एकूणच, राजकीय-सामाजिक वारसा, वैयक्तिक अभ्यासू वृत्ती, विकासाची स्पष्ट दृष्टी आणि तरुणाईला योग्य दिशा देण्याची तळमळ यामुळे आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपकडून अमेय विजय आरोंदेकर यांचे नाव सध्या तरी सर्वाधिक प्रभावीपणे पुढे येत आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.तसेच आरोंदा जि प मतदारसंघात आरोंदा गाव हा मतदार संख्येने मोठा असल्याने हा गाव कायमच निर्णायक ठरतो हा इतिहास आहे त्यामुळे आरोंदा गावातील उमेदवार असल्यास विजय निच्छित मानला जात आहे असे बोलले जात आहे.
