⚡वेंगुर्ला ता.११-: महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी सहकुटुंब प्रसिद्ध आरवली श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवस्थान बाबतची पुरातन महती जाणून घेतली व देवस्थानच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी त्यांचे स्वागत केले, तसेच शाल, श्रीफळ व वेतोबाचा प्रसाद देवून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातन, जागृत आणि प्रसिद्ध अशा या आरवली श्री देव वेतोबा देवस्थानच्या मुळ स्थापनेपासून, नवस, पादुका, केळयांचा घड का अर्पण करतात याबाबतची सविस्तर माहीती अध्यक्ष जयवंत राय यांनी त्यांना विस्तृतपणे दिली. श्री देव वेतोबाची ही आख्याधिका ऐकून मनुकुमार श्रीवास्तव आणि कुटुंबीय भारावून गेले आणि पुन्हा आवर्जुन भेट देण्याचे वचन दिले.यावेळी वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी, मंडळ अधिकारी श्री. मयेकर, देवस्थानचे सेकेटरी आबा टांककर, विश्वस्त डॉ. प्रसाद साळगांवकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांची आरवली श्री देव वेतोबा देवस्थानास भेट…
