सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा प्रभाव

समुद्राला आलेल्या भरतीच्या लाटा किनाऱ्याच्या दिशेने;नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मच्छिमार सज्ज

मालवण दि प्रतिनिधी तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव आता मालवणसह सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर जाणवू लागला असून आज दुपारी समुद्राला आलेल्या भरतीच्या लाटांनी किनाऱ्याच्या दिशेने धाव घेतल्याने मच्छिमारानी आपल्या नौका सुरक्षित स्थळी हलविल्याच शिवाय किनाऱ्यावर इतस्ततः पडलेल्या मच्छिमारी साहित्याची बांधाबांध करीत त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या एकूणच मालवण तालुक्यातील मालवण, दांडी,तारकर्ली,देवबाग, तोंडवली, तळाशील, आचरे,कालावल किनारपट्टीने या चक्रीवादळाचा धसका घेतला असून या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकही सज्ज झाले आहेत प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ व १५ मे रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तर दिनांक १६ व १७ मे रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यात वर्तविण्यात आलेली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळला असून आज समुद्राला आलेल्या उधाणामुळे किनाऱ्यावरील वस्तीपर्यंत लाटांचे पाणी पोहचत होते. मालवण दांडी किनाऱ्यावर समुद्राचे पाणी वाढल्याने नौका व मच्छीमारी साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी मच्छीमारांची धावपळ सुरू होती. वादळाचा परिणाम काल शुक्रवारी रात्रीपासून जाणवू लागला असून मध्यरात्री अडीज वाजता मालवणात ढगांचा गडगडाट व विजांच्या लखलखाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वारा व गडगडाटाने नागरिकांच्या उरात धडकी भरली. सुमारे तासभर पडलेल्या या पावसाने मालवणवासीयांची झोप उडवली. यावेळी वीज पुरवठा देखील खंडित झाल्याने मालवण अंधारात बुडाले होते. सागरी अतिक्रमणग्रस्त गाव असणाऱ्या देवबाग गावाच्या किनारपट्टीवरही उधाणाचा जोर दिसून आला. दुपारी पावणे दोन वाजता उच्चतम भरतीच्या वेळी समुद्राच्या लाटा बंधाऱ्यापर्यंत येऊन धडकत होत्या. देवबाग, तारकर्ली किनाऱ्यावर देखील समुद्राचे पाणी आतपर्यंत घुसल्याने नौका सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी मच्छीमारांचे प्रयत्न सुरू होते. तर देवबागला वेढुन असणाऱ्या कर्ली खाडी पात्रातील पाण्याच्या पातळीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. वादळी वारा व पाऊस यापासून घरांची नुकसानी होऊ नये यासाठी ग्रामस्थांकडून डागडुजीची कामे युद्धपातळीवर सुरू होती. समुद्रातील लाटांची उंची वाढत असून धोक्याचा इशारा म्हणून तीन नंबरचा बावटा मालवण बंदरात लावण्यात आला आहे. नगराध्यक्ष कांदळगावकर यांची पहाणी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक यतीन खोत यांनी शनिवारी दुपारी मालवणच्या किनारपट्टीचा आढावा घेतला.यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नगर पालिकेमार्फत आपत्कालीन पथक आणि सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली असून आवश्यकता भासल्यास नागरिकांना स्थलांतरासाठी पालिकेच्या मालकीच्या इमारती अथवा शाळा उपलब्ध करून देण्यात येतील, असं नगराध्यक्षांनी म्हटलं आहे. भाजी मंडई नजीकचा गटार तात्काळ खुला करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोणतीही मदत लागल्यास पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केलं आहे.

You cannot copy content of this page