⚡मालवण ता.०८-:
सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग खेळाडूंसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी दि. १० व ११ जानेवारी रोजी वाडीया पार्क, अहिल्यानगर येथील क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील (जन्म २०११ ते २०१२) मुला-मुलींना या निवड चाचणीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध असून, त्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराकडे वाटचाल करण्याचा मार्ग खुला होणार आहे.
या निवड चाचणीत मुलांसाठी १६०० मीटर धावणे, व्हर्टिकल जम्प व ब्राॅड जम्प तसेच मुलींसाठी ८०० मीटर धावणे, व्हर्टिकल जम्प व ब्राॅड जम्प अशा चाचण्या घेण्यात येणार असुन या चाचण्यांच्या आधारे खेळाडू निवडले जाणार आहेत. ही निवड चाचणी रोड सायकलिंग,ट्रॅक सायकलिंग व माउंटन बाईक (एमटीबी) स्पर्धांच्या प्रकारांसाठी आहे. निवड प्रक्रियेत यशस्वी झालेल्या खेळाडूंना स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) तर्फे उच्च दर्जाचे प्रशिक्षण, निवासी सुविधा तसेच क्रीडा शिष्यवृत्तीच्या संधी मिळणार आहेत. खेळाडूंनी निवड चाचणीस येताना जन्म दिनांकाचा दाखला, गुणपत्रिका, आधारकार्ड व पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या निवड चाचणीत मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घ्यावा, अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे सचिव अजय शिंदे (९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
