⚡मालवण ता.१२-: “आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी व्हावा. विद्यार्थ्याने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासताना प्रगतीचा ध्यास धरावा” असे प्रतिपादन भरतगड इंग्लिश मिडियम स्कूल मसुरे येथे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने श्री. संग्राम प्रभूगावकर यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.
या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने, डॉ. सुधीर मेहेंदळे, डॉ. अनिरुद्ध मेहेंदळे, संदीप हडकर , मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, संस्था पदाधिकारी राजन परब,संतोष सावंत, सन्मेश मसुरेकर, जगदीश चव्हाण, प्रशांत पारकर, देवू जंगले, श्रीकृष्ण सावंत, शीतल माडये, नंदकिशोर गोसावी, तालुक्यातील शिक्षक, संस्था सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने म्हणालेत विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यातील बारकावे जाणून घ्यावेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायला शिकावे. मालवण तालुक्यातील ग्रामीण भागातील गुणवत्ता उत्तम दर्जाची असून त्याला योग्य दिशा देण्याचे काम येथील शिक्षक तसेच विज्ञान मंडळ करत आहेत.”
या प्रदर्शनात प्राथमिक विभागातून 30 व माध्यमिक भागातून 28 विद्यार्थी प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थी गटातून ७ प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. याशिवाय वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा, शिक्षक तसेच परीचर निर्मित साहित्य स्पर्धा, घेण्यात आल्या.
प्रदर्शनाच्या संयोजनाची जबाबदारी भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक, संस्था पदाधिकारी व पालकांनी उत्तम प्रकारे पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली म्हाडगुत यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोषी मांजरेकर यांनी केले.
